Home मुंबई *वरळीतील मूलभूत समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात – उपसभापती सचिन अहिर*

*वरळीतील मूलभूत समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात – उपसभापती सचिन अहिर*

24
0

*वरळीतील मूलभूत समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात – उपसभापती सचिन अहिर*

*मुंबई महापालिका आयुक्तांसोबत उपसभापती सचिन अहिर यांची महत्त्वपूर्ण बैठक*

मुंबई – वरळी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असली, तरी स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि अडचणी मार्गी लावणे तितकेच गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी त्यांच्या दालनात बृहन्मुंबई महापालिका आयुक्त, अश्विनी भिडे यांच्यासोबत एक विशेष आढावा बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत वरळीतील विविध प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. महापालिका आयुक्तांनी हे सर्व प्रश्न समजून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या बैठकीत आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि उड्डाणपुलांची जोडणी यांसारख्या महत्त्वाच्या नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

वरळीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, धोबीघाट येथील पालिकेच्या जागेवर मोफत प्रसूतिगृह आणि लहान मुलांचे विशेष रुग्णालय उभारण्यात यावे. माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमी ही पूर्ण क्षमतेने सुरू करावी. अंत्यसंस्कारादरम्यान होणाऱ्या धुराचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी धूर बाहेर जाण्यासाठीची व्यवस्था खुली व दुरुस्त करावी.

आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकासमोरील रस्त्यांवरील अडथळे दूर करून फूटपाथची समपातळी साधावी. कोस्टल रोड परिसरात रिलायन्स कंपनीमार्फत सुशोभीकरणाची कामे सुरू असली, तरी तेथील पदपथ आणि उद्यानांकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांची मोठी रहदारी पाहता या संपूर्ण परिसराची आणि उद्यानांची योग्य देखभाल आणि सुशोभिकरण करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाजवळील डेब्रिज (कामाचा कचरा) हटवून जागा मोकळी करावी. तसेच मेट्रोची कामे पूर्ण झाल्यावरही एमएमआरडीएने पालिकेला जागा हस्तांतरित केली नसल्याकडे त्यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले.

सात रस्ता येथील मोनोरेल ब्रिज अद्याप मेट्रो स्टेशनला जोडला गेला नसल्याने प्रवाशांना मोठा वळसा घालावा लागत आहे. हे जोडणीचे काम तातडीने पूर्ण करावे. पालिकेच्या वाहनतळांवर पे अँड पार्कचे दर जास्त असल्याने स्थानिकांना वाहने उभी करणे कठीण जात आहे. त्यामुळे दर कमी करून स्थानिकांसाठी सवलतीच्या दरात मासिक पास उपलब्ध करून द्यावेत. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडचा नवीन सुधारित आराखडा तयार करावा, आदी सूचनाही उपसभापती सचिन अहिर यांनी पालिका मुंबई महानगर पालिका आयुक्तांना केल्या.

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारकाबाबत चर्चा*
मुंबईत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री, आमदार यांच्या सहकार्याने उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली. या स्मारकासाठीच्या जागेबाबतही त्यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा केली.

वरळीतील परिसराचा विकास साधताना स्थानिक नागरिकांचे हित आणि पुनर्वसन सुरक्षित ठेवण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. या बैठकीस महापालिकेचे संबंधित विभागाचे उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here