Home मुंबई *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाची महापौर रितू तावडे यांनी केली...

*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाची महापौर रितू तावडे यांनी केली आकस्मिक पाहणी*

27
0

*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाची महापौर रितू तावडे यांनी केली आकस्मिक पाहणी*

जोगेश्वरी (पूर्व) स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालय येथे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज (दिनांक १९ ऑगस्ट २०२६) सायंकाळी आकस्मिक भेट देवून वैद्यकीय व्यवस्थेची पाहणी केली. पाहणीवेळी रुग्णालय प्रशासनाला महापौर श्रीमती तावडे यांनी विविध निर्देश दिले.

सर्वप्रथम महापौरांनी तळमजल्यावरील महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नोंदणी कक्षाला भेट दिली. सदर कक्ष सकाळी आठ ते दुपारी चार असा मर्यादित न ठेवता संपूर्ण २४ तास कार्यान्वित ठेवावा. आयुष्मान कार्ड धारक रुग्णांना इतर कागदपत्रांची सक्ती करू नये, अशी सूचना महापौरांनी केली.

त्यानंतर, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग तसेच नवव्या आणि दहाव्या मजल्यावर बाल रुग्ण विभाग, महिला वैद्यकीय विभाग, पुरुष वैद्यकीय विभाग इत्यादी विभागांमध्ये महापौरांनी पाहणी केली आणि सर्व रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टर आणि परिचारिका यांच्याकडून मिळणारी वैद्यकीय सेवा समाधानकारक आहे किंवा कसे, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा योग्य आहे किंवा कसे, औषधे उपलब्ध होतात का, स्वच्छता राखली जाते का, इत्यादी प्रश्न विचारत महापौरांनी रुग्णांशी संवाद साधला. एवढेच नव्हे तर, रुग्णांसाठी आलेल्या आहाराचा दर्जा महापौरांनी स्वतः तपासला. आहाराची गुणवत्ता तत्काळ सुधारण्याचे निर्देश महापौर तावडे यांनी दिले.

संपूर्ण रुग्णालयात आणि सर्व विभागांमध्ये स्वच्छता चांगल्या रीतीने राखावी, रुग्णांशी आपुलकीने संवाद साधावा, रुग्णांना सर्व औषधे वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, इत्यादी सूचना महापौरांनी रुग्णालय प्रशासनाला केल्या. तसेच रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ, आरोग्य सुविधा संयंत्रे, अन्य गरजा याबाबत कळवावे, असे देखील त्यांनी सांगितले.

त्यानंतर, दुसऱ्या मजल्यावरील डीएसए कॅथलब येथे जाऊन महापौर तावडे यांनी मज्जातंतू शस्त्रक्रिया विभागातील अत्याधुनिक संयंत्र आणि व्यवस्थेची पाहणी केली. या विभागासाठी पूर्णवेळ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी नेमण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला पत्र देऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्थानिक नागरिकांना सांगितले.

रुग्णालयातील कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या आणि समस्या याबाबत महापौर श्रीमती रितू तावडे यांना निवेदन सादर केले आणि म्हणणे मांडले. कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या तसेच कंत्राटी तत्वावरील डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनासोबत संयुक्त बैठक आयोजित करणार असल्याचे महापौरांनी आश्वस्त केले.

या पाहणीवेळी अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निरंजन क्षीरसागर तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, निम्नवैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here