Home मुंबई *कोकणासह राज्यातील महत्त्वाच्या विषयांकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले ;लवकरच प्रश्न मार्गी लागतील...

*कोकणासह राज्यातील महत्त्वाच्या विषयांकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले ;लवकरच प्रश्न मार्गी लागतील – सुनिल तटकरे*

14
0

*कोकणासह राज्यातील महत्त्वाच्या विषयांकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले ;लवकरच प्रश्न मार्गी लागतील – सुनिल तटकरे

*अधिवेशनात चर्चा करता आली नाही मात्र संबंधित केंद्रीय मंत्र्यांना भेटून दिर्घकाळ रखडलेल्या कोकणातील आणि राज्याच्या विकासकामांकडे लक्ष वेधले…*

 

मुंबई दि. ७ ऑगस्ट – लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक वगळता कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही मात्र जवळपास दहा मंत्र्यांची भेट घेऊन आणि निवेदन देत राज्यातील आणि कोकणातील महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

लोकसभेचे अधिवेशन गेले तीन आठवडे सुरु आहे. या संपूर्ण अधिवेशनामध्ये एक विधेयक वगळता कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकलेली नाही. संसदेत आम्हाला लोकसभा मतदारसंघातील आणि राज्यातील महत्त्वाचे प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध होत असते. परंतु यावेळी मात्र ती संधी मिळू शकली नाही. म्हणूनच उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये राज्यातील दिर्घकाळ रखडलेले प्रश्न होते त्यासंदर्भात संबंधित मंत्र्यांना भेटून न्याय मिळतोय का म्हणून प्रयत्न करावा या हेतूने जवळपास दहा केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट आणि मार्गदर्शन घेतले. याशिवाय कोकणवासीयांना जो प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे मुंबई – गोवा महामार्गाचे काम रखडलेले असतानाच जे टोलनाके सुरु झालेले आहेत त्यासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी भारत सरकारचे धोरण ६० किलोमीटरच्या अंतरावर टोलनाका असावा मात्र ४० किलोमीटरच्या अंतरावर हे टोलनाके उभारले जात आहेत. याची माहिती दिली या गोष्टीची नोंद गडकरी यांनी घेतली आणि तातडीने सूचनाही दिल्या. याशिवाय दिघी ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गांवर ताम्हाणी घाट आहे या घाटात मधल्या कालावधीत अतिवृष्टीमुळे घाट कोसळला होता. ते काम तातडीने पूर्ण झाले मात्र एक दहा किलोमीटरच्या अंतरात बोगदा केला तर संपूर्ण घाटमाथा निघून जाईल म्हणजे मिसिंग लिंकसारखी व्यवस्था ताम्हाणी घाटात होऊ शकते अशी विनंती केली. त्याचाही डीपीआर बनवण्याचे आदेश गडकरी यांनी दिल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. त्यामध्ये कोकणात अॉर्गेनिक फार्मिंग आणि अ‍ॅग्रीकल्चर फार्म त्याचबरोबर कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आपल्याकडील भाजीपाला आणि फुलं यांच्या प्रॉडक्टची क्रिस्टल तयार करण्यासाठी आरपीव्हीआय अंतर्गत त्याला नाशिकला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ठिकाणी निधी मिळावा यादृष्टीने मागणी केली या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भारतसरकारचे पत्र राज्यसरकारला पाठवले आहे हेही सांगितले.

७२० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीमध्ये सागरमाला – २ अंतर्गत काही हजार कोटींचा निधी आपण मागितला आहे. मंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झाली आहे. ७२० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर रायगड लोकसभा मतदारसंघ आहेच शिवाय रत्नागिरीचा समावेश आहे. सागरमाला – २ अंतर्गत हजारो कोटीच्या कामाचे प्रस्ताव दिले आहेत. पुढच्या कॅबिनेट बैठकीमध्ये प्रस्ताव आणला जाईल आणि त्यातून निधी उपलब्ध होईल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

राज्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामे रखडलेली आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने ४३८ कोटी रुपये राज्यसरकारला वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारपर्यंत ते राज्य सरकारला मिळतील. मधल्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी धोरणात्मक निर्णय घेतला त्यामध्ये भारतसरकारचा निधी येईपर्यंत राज्यसरकारने त्यांचा हिस्सा वेगवेगळ्या जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांना दिला होता. त्यादृष्टीकोनातून ४३८ कोटी रुपयांचा निधी वितरीत होईल त्याचबरोबर उरलेल्या कामांसाठी निधी लागणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने १९ निकष दिले आहेत त्या १९ निकषांची पूर्तता केली तर आणि तसा प्रस्ताव राज्यसरकारने पाठवला तर जवळपास ५ ते साडेपाच हजार कोटींचा निधी अपूर्ण कामांसाठी लागणार आहे तो निधी देण्याचे आश्वासित सी आर पाटील यांनी केल्याचे सांगतानाच सुनिल तटकरे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहे हेही आवर्जून सांगितले.

आपल्या राज्यात काही अल्पसंख्याक ओरीएंटल तालुके घोषित झाले आहेत. त्याठिकाणी अल्पसंख्याक समाजाची संख्या मोठ्याप्रमाणात आहे त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री किरण रिजूजी यांना निवेदन देऊन माझ्या लोकसभा मतदारसंघातील या समाजासाठी ७०-८० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्या प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली. यासंदर्भात एक नवीन योजना लवकरच येत आहे. त्यात अंतर्भाव करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

रायगड – रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या पीएमएसएसवाय, पीएमएमपीएसएमवाय आणि एफआयबीएफ या चार योजनांमध्ये क्लस्टरद्वारे काही कोल्डस्टोरेजचे एक्सपोर्ट ओरीएंटेड काही बाबी करायच्या असतील तर आज आपल्या राज्याला एक हजार कोटी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध होते त्यात केवळ या ७२० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीमध्ये मच्छीमार बांधवांचे उत्पादन होऊ शकते. यामध्ये अजून फॅसिलिटी वाढवल्या तर मोठ्या प्रमाणावर परकीय चलन आपल्या राज्याला मिळू शकते. अशी माहिती संबंधित मंत्री राजहंस सिंग यांना भेटून दिली.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली त्यांना कोकण रेल्वे मार्गावर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये रुपांतर करणे हा एक विषय आणि त्याचबरोबर पेण आणि रोहा रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिकरण करणे आणि दूरपल्ल्याच्या गाड्या पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरीपर्यंत थांबवण्याबाबत प्रयत्न करणे. कोकण रेल्वे मार्गाचे रोहा ते रत्नागिरी दूपदरीकरण झाले आहे. ते थेट सावंतवाडीपर्यंत किंवा मडगावपर्यंत गेले तर दूरपल्ल्याच्या गाड्या वाढू शकतात. याची कल्पना दिली.

आदी आठ ते दहा मंत्र्यांची भेट घेत प्रलंबित असलेल्या प्रश्नांना चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. क्रीडा क्षेत्रात खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत कॉमनवेल्थ गेम्स असेल किंवा २०३६ मध्ये ऑलिंपिक आपल्या देशात होण्यासाठी त्याची पूर्व तयारी म्हणून एशियन गेम असतील किंवा कॉमनवेल्थ गेम्स असतील यामध्ये भारत सरकारने खेलो इंडिया अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा क्रिडा क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आजच भेट घेतली आणि क्रिडा खात्यांतर्गत भारत सरकारकडे प्रस्ताव पाठवायचा असेल किंवा अल्पसंख्याक विभागामार्फत भारत सरकारला काही प्रस्ताव पाठवायचे असतील तर पाठवावेत असे सांगितले. त्याचा फायदा आपल्या राज्याला वेगवेगळ्या योजनांतर्गत मिळणाऱ्या निधीसाठी प्रामुख्याने होऊ शकतो असेही सुनिल तटकरे म्हणाले.

अधिवेशनाचे कामकाज चालू शकले नाही तरी महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून जलजीवन मिशन हा विषय महत्त्वाचा होता. शिवाय भाजीपाला व फुलांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भारत सरकारकडून मान्यता मिळू शकते. आणि याचा लाभ कोकणातील शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यातील आणि कोकणातील महत्त्वाचे प्रश्न केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले त्याची माहिती आपल्याला व्हावी यासाठी ही पत्रकार परिषद घेतल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

 

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here