Home मुंबई १०० वे मराठी साहित्य संमेलन आणि संलग्न उपक्रमांसाठी १८ कोटी रु. मंजूर

१०० वे मराठी साहित्य संमेलन आणि संलग्न उपक्रमांसाठी १८ कोटी रु. मंजूर

21
0

१०० वे मराठी साहित्य संमेलन आणि संलग्न उपक्रमांसाठी १८ कोटी रु. मंजूर

मुंबई, दि. 31 : पुणे येथे होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने मोठी आर्थिक तरतूद जाहीर केली आहे. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्य संमेलनासाठी ५ कोटी रुपये आणि त्याअंतर्गत होणाऱ्या ९९ नांदी साहित्य संमेलनांसाठीही ५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. परदेशातील साहित्य संमेलने, विद्यार्थी साहित्य संमेलने आणि इतर उपक्रमांसह मराठी भाषा संवर्धनासाठी एकूण १८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इमारतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी १ कोटी रुपयांचा धनादेश सामंत यांच्या हस्ते परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. या बैठकीत अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर आणि संमेलन संयोजक राजेश पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सामंत यांनी पुढे सांगितले की, मराठी भाषेच्या विकासासाठी पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. राज्य भाषा सल्लागार समितीची बैठक दर तीन ते सहा महिन्यांनी घेण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. तसेच, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू होणार असून, इतर भाषांतील साहित्य मराठीत आणि मराठी साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी पात्र साहित्यिकांना निधी दिला जाणार आहे.

परदेशात होणाऱ्या १२ साहित्य संमेलनांसाठी सीएसआर निधीतून २ कोटी रुपये, तर राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये, अशा एकूण ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. ग्रामीण साहित्य, बोलीभाषा आणि स्थानिक साहित्यिकांना अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

संयोजक राजेश पांडे यांनी शंभरावे संमेलन जागतिक स्तरावर गाजावे आणि देश-विदेशातील मराठी भाषिकांना जोडणारी व्यापक चळवळ उभी राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष योगेश सोमण यांनीही मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने संमेलनातील उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आश्वासन दिले. सामंत यांनी स्पष्ट केले की, हा उत्सव केवळ कार्यक्रम नसून मराठी भाषेच्या संवर्धनाची व्यापक चळवळ ठरावी, यासाठी शासन साहित्य परिषदेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here