Home मुंबई *स्वयंपुनर्विकास संकल्पनेची माहिती घेण्यासाठी दिल्ली सरकारची टीम मुंबईत*

*स्वयंपुनर्विकास संकल्पनेची माहिती घेण्यासाठी दिल्ली सरकारची टीम मुंबईत*

12
0

*स्वयंपुनर्विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष जाऊन टीमने केली पाहणी! रहिवाशांशीही साधला संवाद*

*आ. प्रवीण दरेकरांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी दिल्ली सरकारचा अभ्यासगट पुन्हा मुंबईत येणार*

मुंबई- दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभ्यासगटाने महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाच्या वांद्रे येथील कार्यालयात येऊन शुक्रवारी स्वयंपुनर्विकास संकल्पनेची संपूर्ण माहिती घेतली. या बैठकीला दिल्ली सरकारच्या अभ्यास गटाचे प्रमुख व स्पेशल कोऑपरेशन रजिस्ट्रार आय. राजा बाबू, डेप्युटी रजिस्ट्रार राकेश कुमार, डेप्युटी सेक्रेटरी विनोद कुमार मिश्रा, स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे विशेष कार्य अधिकारी सुदेश रोझेकर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हर्षद मोरे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी कृष्णा पोटे व यतिन नाईक, सहकार विभागाचे उपनिबंधक संदिपान माटे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

वांद्रे येथील स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाने अभ्यास गटासमोर स्वयंपुनर्विकासाची सुरुवात, प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सोसायट्यांमध्ये आयोजित केलेल्या १६०० पेक्षा जास्त बैठका, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी, सभासदांसाठी आयोजित केलेले असंख्य मेळावे आणि या माध्यमातून जनतेमध्ये केलला स्वयंपुनर्विकास संकल्पनेचा प्रचार व प्रसार, शासनाने मुंबई बँकेची स्वयंपुनर्विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून केलेली नेमणूक, सरकारकडे पाठपुरावा करून स्वयंपुनर्विकासासाठी मिळवून दिलेल्या सवलती, स्वतः मुंबई बँकेने पुढाकार घेऊन मुंबई यशस्वीरित्या पूर्ण केलेले प्रकल्प, स्वयंपुनर्विकासातील समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेला अभ्यासगट, अभ्यासगटाने सरकारला केलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी आणि त्या माध्यमातून स्वतंत्र प्राधिकरणाची झालेली निर्मिती, स्वयंपुनर्विकास करताना गृहनिर्माण संस्था, बँक, प्राधिकरण, पीएमसी, महानगरपालिका, शासन यांची भूमिका, प्रकल्पांचे तांत्रिक व आर्थिक नियोजन याबाबतचे सादरीकरण केले. यावेळी प्राधिकरणामार्फत अभ्यासगटाला राज्य शासनाने स्वयंपुनर्विकासासाठी निर्गमित केलेले शासन निर्णय, दरेकर अभ्यासगटाचा अहवाल, स्वयंपुनर्विकास प्रकल्पांची यशोगाथा, स्वयंपुनर्विकास संकल्पनेवरील विस्तृत टिप्पणी आणि विविध कागदपत्रांचा संच देण्यात आला.

बैठकीनंतर अभ्यासगटाचे प्रमुख आय. राजा बाबू यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, दिल्लीत विशेषतः जुन्या दिल्लीत अनेक इमारती जुन्या व मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात स्वयंपुनर्विकास मॉडेल यशस्वी झाले असल्यामुळे आणि रहिवाशांसाठी ते फायदेशीर ठरत असल्यामुळे स्वयं पुनर्विकास मॉडेलची माहिती घेण्यासाठी दिल्ली सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यासगट गठीत केला आहे. आमच्या अभ्यास गटाला आपला अहवाल दिल्ली सरकारला महिन्याभरात सादर करायचा आहे. आज आम्ही प्राधिकरणात या मॉडेलची माहिती घेतल्यानंतर एक मोठं काम प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या पुढाकारातून उभा राहिलं आणि आम्हीही त्याच आधारावर दिल्लीत पुनर्विकास करू शकतो हा विश्वास आम्हाला आजच्या बैठकीतून मिळाला आहे. अतिशय विस्तृत अशा प्रकारची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आमचा अहवाल सादर करण्यापूर्वी दिल्लीत येऊन मंत्री व विभागासमोर पुन्हा सादरीकरण करावे अशा प्रकारची विनंती आम्ही प्राधिकरणाला केली आहे. दरम्यानच्या काळात आम्ही स्वयं पुनर्विकास मॉडेलचे प्रणेते प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. त्यानंतर आम्ही यशस्वी पूर्ण झालेल्या मुंबईतील एका स्वयंपूर्ण विकास प्रकल्पाला, बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाला भेट देणार आहोत व सोसायटीतील पदाधिकारी आणि सभासदांकडून त्यांचे अनुभवही ऐकणार आहोत. अभ्यासगटाच्या अहवालाच्या आधारे दिल्लीतील जुन्या व मोडकळीस झालेल्या इमारतींचा स्वयंपुनर्विकासातून पुनर्विकास करण्याचा दिल्ली सरकारचा मानस असल्याचेही ते म्हणाले.

चौकट

*अभ्यासगटाकडून स्वयंपुनर्विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी*

दिल्ली सरकारच्या उच्चस्तरीय अभ्यासगटाने चारकोप येथील स्वयंपुनर्विकासातून पूर्ण झालेल्या श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेला तसेच स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या अभिलाषा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच पदाधिकारी, सभासद, पीएमसी यांच्याशीही संवाद साधला.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here