Home मुंबई *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘विनोबा’ उपक्रमाला बळ : ३१ लाखांहून अधिक...

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘विनोबा’ उपक्रमाला बळ : ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ*

6
0

मुंबई, दि. १ : राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (ओएलएफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून या माध्यमातून सुरू झालेल्या ‘विनोबा’ या डिजिटल व्यासपीठाचा विस्तार राज्यातील अधिकाधिक शाळांपर्यंत करण्यात येत आहे.

‘विनोबा’ उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन), जीवनकौशल्य विकास, शिक्षक सक्षमीकरण आणि शाळा-पालक संवाद यांना चालना मिळत आहे. महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील सुमारे ४५ हजार शासकीय शाळा आणि एक लाख ३० हजार शिक्षक या उपक्रमाशी जोडले गेले असून, ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या उपक्रमांतर्गत दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय प्रवेश, एनएमएमएस आणि नासासह विविध स्पर्धा परीक्षांसाठी सराव चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे संबंधित परीक्षांतील यशाचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच चार जिल्ह्यांमध्ये १.३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या एफएलएन मूल्यमापनासाठी साहाय्य करण्यात आले असून, निपुण भारत उद्दिष्टांच्या पूर्ततेत २३ टक्क्यांची सुधारणा नोंदविण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी कथाकथन, कविता सादरीकरण, स्पोकन इंग्रजी यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरमहा ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या नोंदी या व्यासपीठावर प्राप्त होत आहेत. यवतमाळसह १५ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नन्हे सितारे’ या व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी पुण्यासह २५ जिल्ह्यांमध्ये ‘कॉफी विथ सीईओ’ आणि इतर मिळून ११०० हून अधिक प्रत्यक्ष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या डिजिटल प्रणालीमुळे शिक्षकांचा प्रशासकीय कामकाजातील वेळ मोठ्या प्रमाणात वाचून १.१ कोटी तासांहून अधिक वेळेची बचत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एससीईआरटी आणि ओएलएफ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार पालक सहभाग वाढविणे, शाळा व्यवस्थापन समित्यांना सक्षम करणे, विद्यार्थी क्लब, विद्यार्थी पोर्टफोलिओ, माजी विद्यार्थी नेटवर्क, विविध स्पर्धा आणि जीवनमूल्य शिक्षणासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित मूल्यमापन सुविधांद्वारे कविता, कथाकथन आणि स्पोकन इंग्रजी यांसारख्या उपक्रमांचे स्वयंचलित मूल्यांकन करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे अधिक बळ मिळणार असून, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक शिक्षण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here