यावर्षी स्वर्गलोकात अचानक टोकाचा वाद उत्पन्न झाला होता. अर्थात स्वर्गातल्या देवांचा आपापसातच… याचं कारण अगदी क्षुल्लकच होतं… येणाऱ्या अधिकमासातल्या अधिष्ठानाबाबतची होती ती वादावादी…! जवळ जवळ फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरावड्यापासूनच ही वादावादी सुरु झाली होती. मार्च महिन्यानंतर हा वाद अगदी विकोपालाच गेला.
देवांच्या या वादाचा परिणाम पृथ्वीला पर्यायाने पृथ्वीवर राहणाऱ्या प्राणीमात्रांना भोगावा लागला… बाकीच्या देवांमधला वाद हळूहळू शांत झाला पण… अरुणराजा आणि वरुणराजा या दोघांमधला वाद मिटता मिटत नव्हता… म्हणूनच यावर्षी अरुणराजाच्या मनातल्या रागामुळे पृथ्वीवरचा पारा जरा चढाच होता.
अरुणराजा आणि वरुणराजाच्या या वादानंतर वरुणराजाने अरुणराजाकडे सुट्टीसाठी अर्ज टाकला… मनातल्या रागाचं कारण होतंच शिवाय त्याला तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यालाही नितवर्षानुसार हजर राहायचं होतं… पण अरुणराजाने आपल्याशी झालेल्या वादामुळे वरुणराजाची ही विंनती फेटाळून लावली… त्यावेळीही पुन्हा त्या दोघांमध्ये वाद झालाच… परिणामी अरुणराजा पुन्हा भडकला… त्याचा परिणाम पुन्हा पृथ्वीवर झाला… आणि पृथ्वीवरच्या प्राणीमात्रांवरही झाला…
या गोष्टीमुळे अवघी पृथ्वीच तप्त झाली… पृथ्वीवरच्या प्राणीमात्रांचे जीव कासावीस होऊ लागले… नदीनाल्यांचे घसे कोरडे पडले… कधी नव्हे ते साक्षात हिमालयसुद्धा घामाघुम झाला… अवघे प्राणीमात्र आणि निसर्ग त्रस्त झाला… पण… अरुणराजाला दयेचा पाझर फुटतच नव्हता… पृथ्वीचे होणारे हाल बघून वरुणराजा कासावीस होऊ लागला… तो अस्वस्थ होऊ लागला… कसंही करून त्याला पृथ्वीला भेटायला यायचेच होते… शिवाय तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखीबरोबर नाचायचेही होते… पुन्हा पुन्हा विनवण्या करूनही आणि इतर देवांनी मध्यस्थी करूनही अरुणराजाच्या अंत:करणाला पाझर फुटतच नव्हता… त्याच्याकडून संमती काही मिळत नव्हती… अधिक ज्येष्ठ मास संपायला काही दिवसच उरले… आषाढाची चाहूलही लागली… आणि वरुणराजाची घालमेल होऊ लागली… म्हणूनच अधिक ज्येष्ठ संपत असतानाच आभाळात वरुणराजाच्या दूतांची अर्थात मेघांची दाटी होऊ लागली होती…
एवढं होऊनही अरुणराजाची परवानगी मिळतच नव्हती… त्याचं डोकं रागाने तापलेलंच होतं… त्या रागातच आपल्या तप्त किरणांनी तो पृथ्वीला भाजून काढीत होता. त्यानंतर निज ज्येष्ठ सुरु होऊनही आठ-दहा दिवस उलटून गेले… वरुणराजाच्या मनाची घालमेल सुरूच होती. त्यानंतर एका क्षणी वरुणराजाची सहनशक्ती संपली… त्याने मनाशीच ठरवलं आता बंड करण्याशिवाय पर्याय नाही… आणि खरोखरच वरुणराजाने बंड केलं… कारण पृथ्वीचे होणारे हाल त्याला बघवत नव्हतेच… शिवाय तुकाराम महाराज आणि माऊलींची पालखी पंढरपुराकडे प्रस्थान करण्याचा दिवसही जवळ जवळ येऊ लागला होता… वरुणराजाने अरुणराजाचा आदेशच धुडकावून लावला शिवाय आपल्या दूतांसगे प्रत्यक्ष अरुणराजावरच चाल करून गेला… म्हणूनच आभाळात वरुणदूत मेघ दाटून येऊ लागले… आणि एके दिवशी प्रत्यक्ष वरुणराजा आभाळातून धो धो कोसळू लागला… वरुणराजाचं ते अगम्य रुप पाहून अरुणराजानेही स्वत:ला आपल्या महालात कोंडून घेतलं…
वरुणराजा बरसायला लागताच… अवघी अवनी हिरवाईचा नवा साज अंगावर लेवू लागली… नदी-नाल्यांची अंत:करणं उचंबळून येवू लागली… त्याच्या आगमनाची वाट पाहणारी अवघी धरतीच अत्यानंदाने मोहरून आली…
वरुणराजा आभाळातून धुवांधार बरसायला लागल्याबरोबर सरितांची अंत:करणं उचंबळून येऊ लागली… इतकी उचंबळून आली की, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे ईशपदांचं प्रक्षालन करण्याची महासंधीच प्राप्त झाली… नाशिकच्या रामकुंडाजवळ गोदेने हनुमानाचं पद-प्रक्षालन केले आणि ती तृप्त झाली… कृष्णेने नरसिंहवाडीला श्री गुरु दत्तात्रेयाचं पद-प्रक्षालन करून ती कृतकृत्य झाली… आणि इंद्रायणीने वारीचं प्रस्थान होण्यापूर्वीच देहूला तुकाराम महाराजांचे आणि आळंदीला माऊलींचे पाय धरले…
वरुणराजाचं बंड अजूनही शमलंच नव्हतं… त्याच्या डोक्यात राग धुमसतच होता… तो त्याच्या वागण्यातून जाणवत होताच… तशातच ८ जुलैचा दिवस उगवला… तुकाराम महाराजांच्या वारीच्या प्रस्थानाचा दिवस… ‘विठ्ठल विठ्ठल’ च्या गजरात अवघी देहू नगरी धुंद झाली… वरुणराजाही देहूत पोहोचला आणि त्याचा अर्धा हेतू सफल झाला… त्यामुळे त्याच्या डोक्यातला राग थोडा थोडा शमू लागला… वरुणराजाने वारकरी बांधवांबरोबर मनसोक्त वारीत नाचण्याचा आपला बेत सफल करून घेतला आणि त्या वारीसंगेच पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला…
इकडे आळंदीतही माऊलींच्या पालखीची जय्यत तयारी झालीच होती… वरुणराजाचं ते रौद्र रुप पाहून शासनाने वारकरी भक्तांना विनंती केली की, त्यांनी पुण्याच्या मुक्कामापासून वारीत सहभागी व्हावं… पण वरुणराजाने माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतल्याबरोबर त्याचं डोकं पूर्ण शांत झालं… त्याच्या डोक्यात इतका राग होता हे सांगूनही कोणाला खरं वाटलं नसतं इतका तो शांत झाला… तुकाराम महाराजांच्या वारीने पंढरपुराकडे प्रस्थान केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माऊलींची पालखी पंढरपुराकडे निघाली… माऊलींच्या वारीत सहभागी झाल्यावर त्याच्या डोक्यातल्या रागासहित वादाचे सगळेच विचार विसर्जित झाले… आणि तो ‘विठ्ठल विठ्ठल’ करत भान हरपून नाचू लागला…
तिकडे वरुणराजाचा शांत झालेला राग जाणवल्याबरोबर अरुणराजा हळूच महालाबाहेर डोकावून पाहू लागला… आणि एका क्षणी तो महालाबाहेर आलाच… वरुणराजाचा राग शांत झाला… पण… वरूणराजाने आपल्याविरुद्ध केलेलं बंड आठवून अरुणराजाचा मात्र पारा पुन्हा चढू लागला… सध्या त्याचाच अनुभव आपण घेत आहोत… पटतंय ना…!!
*-विजय मडव, बोरीवली, मुंबई. 98201494990, madavvijay@gmail.com (लेखक ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक आहेत.)*



















