चेंबूरच्या माता रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह व श्रीमती दिवालीबेन मेहता ( मॅा) सर्वसाधारण रुग्णालय येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर) प्राजक्ता वर्मा – लवंगारे यांनी काल सायंकाळी (दिनांक ७ जुलै २०२६) आकस्मिक पाहणी करून रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला.
रुग्णालयातील हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (एच.एम.आय.एस. प्रणाली) योग्यप्रकारे कार्यान्वित आहे का? याची प्रत्यक्ष संगणकावर पाहणी केली. तसेच रूग्णालय प्रशासनाला प्रणालीच्या वापराच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना केल्या. रूग्णालय परिसरातील रिक्त झालेल्या कर्मचारी निवासस्थानाच्या जागेची आणि लगतच्या मोकळ्या भूखंडाची पाहणी केली. तसेच संबंधित विभागाला याबाबत आतापर्यंत केलेल्या पत्रव्यवहाराची सविस्तर माहितीही सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर) यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्ण व महिन्याभरात होणाऱ्या प्रसूती रुग्णांबाबतची सविस्तर माहिती घेतली.
दिवालीबेन मेहता ( मॅा) सर्वसाधारण रुग्णालयाच्या आस्थेपनेवरील डॉक्टर व कर्मचारी यांची किती पटसंख्या आहे, याची सविस्तर माहिती घेतली. त्यासोबतच संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. सध्यस्थितीत रुग्णालयाच्या दुरुस्ती व डागडुजीचे काम सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उपचारासाठी दाखल रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देऊन त्यांना वेळेत औषधोपचार देण्याचे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर) यांनी यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, सर्वसाधारण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
…….



















