*चंदनवाडीस्थित दवाखाना, आरोग्य केंद्र, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृह, जी (उत्तर) विभाग कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी*
*सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, आरोग्य सुविधांचा घेतला आढावा*
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधांचे रुग्णसेवेच्या बाबतीत नावलौकिक आहे. तथापि, रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालय अंतर्गत चंदनवाडीस्थित दवाखाना, आरोग्य केंद्र, पॉलिक्लिनिक, ठाकूरद्वार येथील सूर्यकांत वगळ प्रसूतिगृह, जी (उत्तर) विभाग कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे यांनी आज (दिनांक २६ जून २०२६) पाहणी केली. तसेच, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा व आरोग्य सुविधांचा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला. त्यावेळी श्रीमती वर्मा बोलत होत्या.
उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, सहायक आयुक्त (सी विभाग) श्रीमती अलका ससाणे, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) श्री. योगेश देसाई आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे यांनी आज सकाळी चंदनवाडीस्थित दवाखान्याला भेट दिली असता, दवाखान्याच्या नोंदणी विभागापासून औषधी, हिवताप निर्मूलन, प्रयोगशाळा, रुग्ण उपचार आदी विभागांची तसेच प्रसाधनगृहांची प्रत्यक्ष पाहणी केली. एचएमआयएस संगणकीय प्रणाली, सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांचे प्रकार, रुग्णांची स्थिती, उपचार पद्धती आणि अडचणी आदींची माहिती जाणून घेतली. तसेच, चंदनवाडी आरोग्य केंद्रास भेट देऊन त्यांनी राष्ट्रीय अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रम, योजना, लसीकरण आदींबाबत माहिती जाणून घेतली. दरम्यान, ठाकूरद्वार येथील सूर्यकांत वगळ प्रसूतिगृहाच्या भेटीवेळी त्यांनी गरोदर माता आणि त्यांच्या नवजात बालकांची आस्थेने विचारपूस केली.
पाहणी दौऱ्यानंतर दुपारी श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा व आरोग्य सुविधांचा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न व्हावेत. प्रसूतिगृहांमध्ये उत्तमोत्तम सुविधा असाव्यात. प्रामुख्याने महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. स्मशानभूमींच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, रुग्णाला पुढील आवश्यक उपचारासाठी एका ठिकाणाहून (आरोग्य केंद्र, पॉलिक्लिनिक, दवाखाना) अन्य आरोग्य यंत्रणेकडे (सर्वसाधारण रुग्णालये, सुपरस्पेशालिटी रुग्णालये) पाठवण्यासाठी डिजिटल, संगणकीकृत आणि जीआयएस-आधारित यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे यांनी यावेळी दिले.
***
(जसंवि/२२८)



















