Home दिल्ली *आमच्यात मतभेद नाहीत, विधान परिषद निवडणुकीत महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार*

*आमच्यात मतभेद नाहीत, विधान परिषद निवडणुकीत महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार*

11
0

*मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

नवी दिल्ली, ता. २८ : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला असल्याचे सांगत, “महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास वेगाने पुढे नेत आहोत,” असे शिंदे म्हणाले. एक तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असताना “आमच्या आधी मीडियालाच एवढी घाई का झाली आहे?” असा सवालही त्यांनी केला.

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता, सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
“मी मुख्यमंत्री असताना अजितदादा आणि देवेंद्रजींसोबत मिळून मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय, न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना आणि १० टक्के आरक्षण देण्याचे काम आम्ही केले,” असे सांगत त्यांनी सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.

उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असून मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आसाममध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सर्मा यांचे अभिनंदन केले. “एक देश, एक कायदा” ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका सुरुवातीपासूनच राहिलेली आहे, असे त्यांनी सांगितले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा एका देशात दोन कायदे असू शकत नाहीत, असे स्पष्ट केले असल्याचे सांगत, महाराष्ट्रातही या विषयावर सकारात्मक विचार केला जाईल, असे शिंदे यांनी म्हटले.

बाळासाहेब ठाकरे यांची राम मंदिर, कलम ३७० हटवणे आणि समान नागरी कायदा ही तीन स्वप्ने होती. त्यापैकी दोन स्वप्ने पूर्ण झाली असून तिसरे स्वप्नही पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आदिवासी तसेच अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या आरक्षणावर समान नागरी कायद्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करत, काहीजण समाजात दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

खासदार संजय राऊत यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “महायुती मजबूत आहे आणि महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू असल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत.” भारतीय जनता पक्ष हा देशातील नंबर एकचा पक्ष असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकाची ताकद असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, “देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची भाषा करणाऱ्यांची आज काय अवस्था झाली आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
मुंबईतील बीच कँडी क्लब येथे मेंबरशिपसाठी युरोपियन पासपोर्टची अट असल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी कठोर भूमिका घेतली.“मुंबईत असा कोणताही भेदभाव करणारा क्लब असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल,”असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीबाबत बोलताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राशी समन्वय साधणे हे मुख्यमंत्री म्हणून कर्तव्यच असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here