*‘आयओटी’ तंत्रज्ञानामुळे उदंचन पंपांवर प्रभावी नियंत्रण शक्य – महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे*
मुंबई महानगरातील सखल भागांमध्ये जोरदार पावसावेळी साचणाऱया पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत अहोरात्र (३ सत्र) मनुष्यबळासह ५४७ उदंचन संच (Portable Dewatering Pumps) कार्यान्वित करण्यात आले आहेत. या यंत्रणेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभाग समन्वयाने कार्य करीत आहेत. उदंचन संचांच्या कार्यावर सतत देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक ‘आयओटी आधारित देखरेख प्रणाली’ (IoT Based Monitoring System) विकसित करण्यात आली असून प्रत्येक उदंचन पंपावर ‘आयओटी’ (Internet of Things) उपकरण बसविण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे उदंचन पंपाची कार्यस्थिती, स्थान, सुरू – बंद होण्याची वेळ, कार्यरत कालावधी आणि तांत्रिक माहितीची स्वयंचलित नोंद (Logging) ठेवली जाणार आहे. ही माहिती केंद्रीकृत डॅशबोर्डवर प्रत्यक्ष वेळेत (Real-Time) उपलब्ध होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पंपांच्या कार्याचा तत्काळ आढावा घेणे, तांत्रिक अडचणी ओळखणे आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.
आयओटी लॉगिंग प्रणालीमुळे उदंचन संचांच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता निर्माण झाली आहे. उदंचन पंप प्रत्यक्षात किती वेळ कार्यरत होता, त्याद्वारे किती कालावधीसाठी पाण्याचा उपसा करण्यात आला, तसेच संबंधित यंत्रणेचा वापर योग्य पद्धतीने झाला आहे का, याची नोंद डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहत असल्याने कामाचे अचूक परीक्षण करता येते. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन कार्यक्षमतेत वाढ होईल, असेदेखील भिडे यांनी नमूद केले.
मुंबई महानगरात अतिवृष्टीच्या काळात सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचू नये आणि नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत विविध ठिकाणी एकूण ५४७ उदंचन संच (Dewatering Pumps) कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. त्यात शहर विभागातील १४६, पूर्व उपनगरे विभागातील १७८ आणि पश्चिम उपनगरातील २२३ उदंचन संचांचा समावेश आहे. उदंचन संचाच्या माध्यमातून साचलेले पावसाचे पाणी जलद गतीने उपसून ते जवळील नाले, जलवाहिन्या किंवा समुद्राकडे वळविण्याचे कार्य केले जाते. विशेषतः सखल भाग, रेल्वे उपमार्ग, महत्त्वाचे रस्ते, चौक, तसेच पूरप्रवण परिसर येथे हे उदंचन संच तैनात करण्यात आले आहेत. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ‘आयओटी लॉगिंग प्रणाली’ विकसित करण्यात आली आहे. या डॅशबोर्डची पाहणी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवार (दि. २९ मे २०२६) आपत्कालीन व्यवस्थापन विभाग येथे केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) रश्मी लोखंडे, कार्यकारी अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) वनिता कोकाटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
५४७ उदंचन संचाचे संचलन करण्यासाठी ३ सत्रांमध्ये मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत. पंप चालक (Operator) यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी पंप चालक प्रतिनिधीची आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. पंप ऑपरेटर्सना स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याद्वारे संबंधित ठिकाणांचे छायाचित्र नियंत्रण कक्षात तात्काळ उपलब्ध करून देता येणार आहेत. उदंचन पंप कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक इंधन साठा (Fuel Stock) उपलब्ध असल्याची खात्री करण्याची जबाबदारी पंप चालकाची असेल. प्रत्येक उदंचन पंपाच्या ठिकाणी पंप चालकाला देण्यात आलेल्या मोबाईल फोनचे जिओ – फेन्सिंग (Geo-Fencing) करण्यात येणार आहे. यासाठी विकसित करण्यात आलेल्या अँड्रॉइड मोबाईल अॅपच्या माध्यमातून पावसाळी कालावधीत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि हजेरीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, उदंचन संचांचे कार्य प्रभावीपणे आणि वेळेत सुरू राहावे, यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभाग यांच्यात सातत्याने समन्वय साधला जातो. हवामान विभागाकडून प्राप्त होणारा पावसाचा अंदाज, भरती – ओहोटीची माहिती, विविध विभागांकडून मिळणाऱ्या तक्रारी, तसेच प्रत्यक्ष क्षेत्रातील परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित भागातील उदंचन संच तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या जातात. आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षामार्फत संबंधित अभियंते, कर्मचारी आणि यंत्रणांशी समन्वय ठेवून जलद प्रतिसाद दिला जातो. उदंचन संचांच्या कार्यावर प्रभावी नियंत्रण आणि सतत देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक ‘आयओटी लॉगिंग प्रणाली’ विकसित करण्यात आली आहे.
श्रीमती भिडे पुढे म्हणाल्या की, या संपूर्ण यंत्रणेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी ‘डिवॉटरिंग पंप मॉनिटरिंग सिस्टीम डॅशबोर्ड’ विकसित करण्यात आला आहे. या प्रणाली अंतर्गत प्रत्येक उदंचन संचावर इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आधारित विशेष उपकरण बसविण्यात आले आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून महानगरातील सर्व कार्यान्वित उदंचन संचांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक पंपाची स्थिती, तो सुरू अथवा बंद आहे का, कार्यरत वेळ, पाण्याचा उपसा करण्याची क्षमता, संबंधित ठिकाणाचा तपशील, तसेच प्रत्यक्ष वेळेतील (real-time) माहिती, उदंचन संच चालकांचा संपर्क क्रमांक या प्रणालीवर पाहता येते. काही ठिकाणी बसविण्यात आलेल्या सेन्सर आणि डिजिटल प्रणालीच्या साहाय्याने पाण्याची पातळी वाढल्यास तत्काळ अलर्ट प्राप्त होतो आणि यंत्रणा सक्रिय केली जाते. आयओटी लॉगिंग प्रणालीमुळे पंपांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येत आहे. एखाद्या पंपामध्ये बिघाड होण्याची शक्यता असल्यास किंवा त्याच्या कार्यक्षमतेत घट दिसून आल्यास तांत्रिक पथकाला पूर्वसूचना मिळणार आहे. त्यामुळे वेळेत दुरुस्ती करून यंत्रणा कार्यरत ठेवणे शक्य होणार आहे. पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त आणि परिणामकारक ठरणार आहे.
या डॅशबोर्डमुळे वरिष्ठ अधिकारी, नियंत्रण कक्ष, तसेच संबंधित विभागांना परिस्थितीचा आढावा घेणे अधिक सुलभ होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि परिणामकारक बनली आहे. तसेच, पंपांच्या कार्यक्षमतेवर सतत देखरेख ठेवून आवश्यक दुरुस्ती, देखभाल आणि मनुष्यबळ नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. परिणामी, पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. सबब. जोरदार पावसावेळी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. या प्रणालीमुळे उदंचन पंप सुरु आहे किंवा बंद आहे, अतिवृष्टीच्या काळात किती पंप सुरु आहेत, किती वेळ बंद आहेत, या बाबी प्रत्यक्ष वेळेत (real-time) कळणार आहे. सध्या याबाबतचा डिस्प्ले महानगरपालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात देण्यात आला आहे. हा डिस्प्ले प्रशासकीय विभागनिहाय उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरुन, पंपांची स्थिती दर्शविणारा डॅशबोर्ड प्रशासकीय विभागांच्या नियंत्रण कक्षात दिसेल. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या संबंधित अभियंत्यांचे संपर्क क्रमांक देखील उपलब्ध करावेत, असे निर्देश भिडे यांनी दिले.
***



















