गुहागर – गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून हवामानाने अचानक कूस बदलली. आकाशात दाट ढगांची गर्दी, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आधीच उत्पादनात घट झालेल्या ‘कोकणच्या राजा’ हापूस आंब्यावर आता अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादन घटले आहे. अनेक बागांमध्ये आंबा काढणीच्या टप्प्यावर असून, अशा वेळी अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाल्यास तयार फळांवर डाग पडण्याचा तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीच उत्पादन कमी आहे, त्यात पाऊस पडल्यास आर्थिक फटका बसणार, अशी चिंता स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
राज्यात सध्या उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवत असून, पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. या अनपेक्षित बदलाचा परिणाम केवळ आंब्यावरच नव्हे, तर इतर पिकांवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवडाभरापासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.




















