मुंबई
मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गृहराज्यमंत्री मा. ना. योगेश कदम यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.यावेळी मुंबईतील महाविद्यालयीन युवकांना लक्ष्य करून वाढत असलेल्या नशेखोरीच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. विशेषतः गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्ज पार्टी प्रकरण, विक्रोळी परिसरातील ड्रग्ज माफियांवर झालेल्या कारवाया, तसेच ओव्हरडोसच्या घटनांमुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
ॲड. अमोल मातेले यांनी नमूद केले की, “मुंबईत ड्रग्ज नेटवर्क संघटित पद्धतीने कार्यरत असून युवकांना त्याच्या विळख्यात ओढले जात आहे. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नसून, राज्याच्या भविष्यासाठी गंभीर सामाजिक संकट आहे.”
प्रमुख मागण्या “ड्रगमुक्त मुंबई” अभियान तात्काळ जाहीर करून व्यापक स्तरावर राबविणे
ड्रग्ज पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करणे
महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये अँटी-ड्रग्ज जनजागृती मोहीम राबविणे ड्रग्ज विक्री व पुरवठ्यात सहभागी असलेल्या माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे पोलिस यंत्रणा अधिक सक्षम करून गुप्त माहिती संकलन व प्रतिबंधात्मक कारवाई वाढविणे
युवकांसाठी समुपदेशन केंद्रे व प्रभावी पुनर्वसन (Rehabilitation) व्यवस्था उभारणे
गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन
मा. ना. योगेश कदम यांनी या गंभीर विषयाची दखल घेत लवकरच संबंधित विभागांची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. येत्या सोमवारी यासंदर्भात सविस्तर बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईसारख्या महानगरात तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवणे ही काळाची गरज असल्याचे ॲड. मातेले यांनी अधोरेखित केले. “ड्रगमुक्त मुंबई” हा केवळ घोषवाक्य नसून, एक व्यापक सामाजिक चळवळ म्हणून राबविणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.



















