मनोरंजनाची भन्नाट मेजवानी घेऊन रंगभूमीवर आलेले ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, आता या नाटकाने आपल्या यशस्वी वाटचालीत शंभर प्रयोगांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. चंद्रकांत कुलकर्णी प्रस्तुत, ‘जिगीषा’ निर्मित, विनोद रत्ना लिखित-दिग्दर्शित ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग नुकताच उत्साहात साजरा झाला. या विशेष प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, आदेश बांदेकर,सुचित्रा बादेकर यांसह अनेक मान्यवर मंडळी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
“या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग एवढ्या उत्साहात साजरा होताना पाहणे, हा खरोखरच आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे.” असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी काढले. ‘परफेक्ट अभिनय, दिग्दर्शन आणि कास्टिंग’ या शब्दांत अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी नाटकाचे मनापासून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मनोरंजन क्षेत्राला सुवर्णकाळ देणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आशीर्वाद लाभणे, ही नाटकातील तरुण कलाकारांसाठी खरोखरच भाग्याची गोष्ट असल्याची भावना अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली.
प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या नाटकाची खासियत म्हणजे त्याची समकालीन आणि तरुण पिढीशी थेट जोडणारी कथा. आजच्या जेन-जी पिढीच्या भावना, विचार आणि वास्तव यांना हलक्याफुलक्या विनोदी शैलीत मांडत हे नाटक रसिकांना आपलेसे वाटते. श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव या नाटकाचे निर्माते आहेत.
श्रेयस जोशी, वैभव रंधवे आणि समृद्धी कुलकर्णी या नवोदित कलाकारांनी या नाटकात प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करताना त्यांच्यासाठी हा अनुभव स्वप्नपूर्तीसारखा ठरत आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक कलाकाराने आपल्या वयाशी आणि पिढीशी सुसंगत अशी भूमिका साकारल्यामुळे नाटक अधिक नैसर्गिक आणि प्रेक्षकांच्या अनुभवाशी जोडणारे ठरते. या नाटकामुळे प्रेक्षकांशी एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. प्रत्येक प्रयोगात मिळणाऱ्या टाळ्या आणि हशा हेच आमचं खरं यश आहे. अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.
उत्कृष्ट लेखन, नेमके दिग्दर्शन आणि नवोदित कलाकारांची दमदार कामगिरी यामुळे ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चर्चेचा विषय ठरत असून, आगामी काळातही ते प्रेक्षकांचे असेच भरभरून मनोरंजन करत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



















