Home मुंबई *वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष छाटणी आणि...

*वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष छाटणी आणि वृक्षगणनेबाबत प्रशिक्षण शिबिर*

14
0

*• पावसाळापुर्व कामांचा भाग म्हणून उद्यान विभागाची यंत्रणा सज्ज*

धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी करावी तसेच वृक्षगणना करत असताना अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर कसा करावा, याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्ष सभागृहात एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर बुधवार दि.१५ एप्रिल पार पडले. पुढील आठवड्यापासून वृक्षगणना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी यावेळी दिली.
उप उद्यान अधीक्षक साहेबराव गावित, सहायक उद्यान अधीक्षक अविनाश यादव, वृक्षतज्ज्ञ विवेक राणे, योगेश कुटे, उद्यान विभागाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी कर्मचारी, कंत्राटदारांनी नेमलेले उद्यान तज्ज्ञ या शिबिरास उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळा सुरू होण्यापुर्वी दरवर्षी मुंबईतील धोकेदायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. या कामांमध्ये पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असतो. यंदाही ही मोहीम अधिक व्यापक स्वरुपात हाती घेण्यात आली आहे. तसेच मुंबईतील वृक्षांची संख्या किती आहे, याबाबतही तज्ज्ञांच्या मदतीने मोजणी करण्यात येणार आहे.

जितेंद्र परदेशी यांनी शिबिरास उपस्थित प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना वृक्ष छाटणी, वृक्ष जनगणनेबाबत माहिती दिली. सहायक उद्यान अधीक्षक अविनाश यादव यांनी वृक्षाचा आकार, मातीची आर्द्रता, हवेचा वेग आणि बांधकामादरम्यान वृक्ष संरक्षण कसे करावे, या विषयांवर मार्गदर्शन केले.

वृक्षतज्ज्ञ श्री. विवेक राणे यांनी शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष छाटणी करताना वृक्ष छाटणी व स्थिती मूल्यांकनाद्वारे वृक्षांचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. वृक्षांमुळे सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे होणारे नुकसान कसे रोखावे, बदलत्या हवामानादरम्यान वृक्षसंरक्षण कसे करावे, वृक्षाचा आकार आणि आरोग्य निरंतर सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत अभिनव संकल्पना मांडल्या. वृक्षगणना कशी केली जाणार, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाणार, तसेच ड्रोनचा या गणनेसाठी कसा उपयोग होणार याबाबत योगेश कुटे यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here