पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचे धक्कादायक विधान
इस्लामाबाद:
पाकिस्तानचे माजी भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासितनी धक्कादायक विधान करुन भारतातील शहरांवर थेट लष्करी हल्ले करण्याचे समर्थन केल्याचे समोर आले.
पाकिस्तानविरुद्ध अमेरिका किंवा इस्रायलने कारवाई केल्यास प्रत्युत्तर म्हणून भारताला लक्ष्य करावे, असे त्यांनी सार्वजनिकरित्या म्हटले आहे.
२०१४ ते २०१७ दरम्यान नवी दिल्लीमध्ये पाकिस्तानचे सर्वोच्च राजनैतिक प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या बसीत यांनी एका लाईव्ह कार्यक्रमात भारताचा ‘डिफॉल्ट टार्गेट’ म्हणून उल्लेख केलाय.
व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये बसीत यांनी पाकिस्तानच्या रणनीतीतील गंभीर चूक उघड केली आहे. अमेरिका सारख्या दूरस्थ शत्रूंवर थेट हल्ला करणे शक्य नसल्याने भारतावर हल्ला करण्याकडे वळण्याची मानसिकता त्यांनी व्यक्त केली. आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य असेल? भारत, असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे असेही सुचवलेय की, पाकिस्तान थेट शत्रूंना लक्ष्य करू शकत नसला तरी भारतातील महानगरांवर हल्ला करण्याचा पर्याय सोडू नये. त्यामुळे भारतीय नागरिकांना कोलॅटरल टार्गेट म्हणून पाहिले जात असल्याचे संकेत मिळतात. मुंबई आणि नवी दिल्लीसारख्या शहरांचा उल्लेख करून त्यांनी २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यांच्या आठवणीही पुन्हा जाग्या केल्यात.
वरिष्ठ गुप्तचर सूत्रांच्या मते, बसीत यांची ही विधाने अचानक केलेली नसून ती पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेकडून तयार केलेल्या कथनाचा भाग असू शकतो. माजी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी म्हणून त्यांना लष्कराच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा आवाज मानले जाते. भारतामध्ये कुठेही लोकांना लक्ष्य करा अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य पाकिस्तानमधील दीर्घकालीन जिहादी विचारसरणीशी जुळते, जी भारताच्या सार्वभौमत्वाला सातत्याने आव्हान देत आली आहे. एकेकाळी द्विपक्षीय शांतता प्रक्रियेसाठी जबाबदार असलेला राजदूत आज भारतीय शहरांना लक्ष्य करण्याची भाषा वापरत असल्याने पाकिस्तानच्या सत्ताकेंद्रात वाढलेल्या कट्टरतेचे चित्र समोर येते.
बसीत यांनी भारताला एकमेव पर्याय म्हणून मांडल्याने,त्यांचे एक धोकादायक आणि निराशाजनक लष्करी धोरण समोर आलेय.
त्यांच्या मते, जर अमेरिका किंवा इस्रायलने पाकिस्तानवर हल्ला केला, तर भारतावर हल्ला करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. भारताला पाश्चिमात्य लष्करी कारवायांशी जोडण्याचा हा प्रयत्न दक्षिण आशियातील संघर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा जाणीवपुर्वक केलेला प्रयत्न मानला जातोय.
जगाने मान्य केले पाहिजे की, पाकिस्तानने भारताकडे पाहू नये, असे म्हणत त्यांनी उलट आंतरराष्ट्रीय समुदायाला असा संदेश दिला की कोणत्याही संकटात पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया भारताशी तणाव वाढवण्याची असते.
भारतीय गुप्तचर संस्थांसाठी ही विधाने सध्यस्थितीच्या ‘हायब्रिड थ्रेट’ वातावरणाची झलक देतात.
बसीतसारख्या सुशिक्षित आणि उच्चपदस्थ व्यक्तींमार्फत अशा हिंसक विचारसरणीचे सामान्यीकरण केले जात असल्याने, सार्वजनिक मत तयार करण्याचा आणि जागतिक स्तरावर संदेश देण्याचा एक प्रयत्न असल्याचे मानले जातेय.
भारतावर हल्ला करण्याचा पर्याय कधीही सोडू नये, या त्यांच्या विधानातून भारत हा पाकिस्तानच्या भू-राजकीय तक्रारींचा कायम केंद्रबिंदू राहणार असल्याचे स्पष्ट होते. सूत्रांच्या मते माजी राजदूताकडून आलेले हे धक्कादायक विधान दर्शवते की, पाकिस्तानातील जिहादी विचारसरणी फक्त टोकाच्या गटांपुरती मर्यादित नसून ती राजनैतिक आणि लष्करी पातळीवर रुजली आहे.




















