Home Uncategorized *पोलादपूरमध्ये यंदा परिवर्तन करा, बदल हवाय*

*पोलादपूरमध्ये यंदा परिवर्तन करा, बदल हवाय*

56
0

*भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकरांचे ग्रामस्थांना आवाहन*

पोलादपूर – पोलादपूरचे मागासलेपण घालविण्याचा शब्द मी देतो, मी वेळी देईन आणि विकास कामेही आणेन. परंतु तुम्ही विश्वास द्या. मी आज तुमच्याकडे मागतोय नंतर मागायची वेळी येणार नाही हा शब्द कर्मवीर भाऊराव पाटील या पवित्र शाळेच्या प्रांगणात देतो. यंदा परिवर्तन करा, बदल हवाय आणि हा बदल आपल्या हिताचा आहे. सर्वांना वाटतेय यावेळी बदल हवा यासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या मागे उभे आहेत. तुम्हीही आशीर्वाद देऊन त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी ग्रामस्थांना केले.

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ शनिवारी आ. दरेकरांच्या प्रमुख उपस्थितीत पोलादपूर येथील पैठण व लोहारे येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश दरेकर, जिल्हा परिषद उमेदवार के. के. कदम,
पंचायत समितीचे उमेदवार सुरेश चव्हाण, युगेंद्र उतेकर, आरपीआयचे सुदास मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दरेकर, आस्वाद पाटील, माजी सभापती दीपिका दरेकर, सरपंच रेखा दळवी, माजी सभापती दिलीप भागवत, नागेंद्र राठोड, मनोज भागवत, तालुका अध्यक्ष वैभव चांदे, अपर्णा जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय उतेकर, कृष्णा कारंजे, अनिल नागवडे, शिवराज पार्टे, शंकर शिंदे, प्रसन्न पालांडे, यशवंत मोरे, सुदेश उतेकर, सहदेव उतेकर, दर्पण दरेकर, नरेश शेलार, विनोद मोरे, प्रमोद मोरे, अनिल नलावडे, संतोष मोरे, तनुजा भागवत, सुभाष दरेकर, कृष्णकांत दरेकर, राजेश सकपाळ यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी लोहारे येथील सभेत जनतेला संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले की, प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. मी चार-पाच दिवस येथे राहिलो तर विरोधकांची भंबेरी उडालीय. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आपल्याला गावागावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. गाव बैठकांत ग्रामस्थ परिवर्तनाच्या मूडमध्ये आहेत. साधे उमेदवार असताना लोकांची एवढी गर्दी जमते याचा अर्थ लोकांनी बदल करायचे नक्की ठरवलेय. माझा जन्म कोतवालसारख्या खेडेगावातला. माझे वडील एसटी कंडक्टर होते. शालेय शिक्षण पैठण सारख्या रयत शिक्षण संस्थेतून घेतले. परिस्थिती बेताची असताना आईने डोक्यावर मासळीच्या पाट्या घेऊन आम्हाला शिकवले. तुमच्यातील गावचा मुलगा आमदार, विरोधी पक्षनेता झाला. आज राज्याचा मंत्र, विधिमंडळाचा नेता म्हणून तुमच्यासमोर आहे. विरोधी पक्ष नेता असताना महाराष्ट्रभर फिरण्याचा योग आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली, सभागृहात प्रश्न मांडले. ज्यावेळी महाराष्ट्रात फिरत होतो त्यावेळी गावच्यागावं स्वच्छ, सुंदर नटलेली दिसली. महाराष्ट्रात विकास होताना मी ज्या मातीतून आलो त्या माझ्या मातीतील लोकं, आया-बहिणी डोक्यावर हंडा घेऊन जाताना दिसताहेत. तालुक्यातील मूलं कामासाठी मुंबईला जाताहेत, रुग्णालय नसल्याने मुंबईला जावे लागतेय. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. त्यामुळे या मातीने आवाज दिला प्रवीण दरेकर तुला लक्ष घालावे लागेल. जर आता घातले नाही तर पुढच्या पिढ्याचे काय होईल? तुला विडा उचलावा लागेल म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्यासमोर आलो असल्याचे दरेकरांनी म्हटले.

तसेच दरेकर पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक महत्वाची आहे. कारण जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर लूटमार होता कामा नये. केंद्र आणि राज्यातून आम्ही निधी आणणार आणि जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत आपला सदस्य नसेल तर येथील लुटारू आपल्या तिजोरीवर डल्ला मारतील. त्याकरिता पहारेकरी म्हणून कदम आणि उतेकर आपल्याला निवडून द्यायचे असल्याचेही दरेकरांनी म्हटले. तसेच रामदास कळंबे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देत दरेकर म्हणाले की, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा मी नेहमी माझ्या कर्तृत्वाची उंची वाढवतो. कळंबे मला उद्देशून म्हणाले की, दरेकरांना किती लोकांनी पाहिले. अरे महाड-पोलादपूरमध्ये शिवसेना मी आणली. गावागावात आम्ही शिवसेनेच्या पाट्यांचे उदघाटन केले. कळंबेचा राजकीय जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी गावागावात फिरत असल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला.

यावेळी बोलताना दरेकरांनी विरोधकांनी केलेल्या घोटाळ्यांचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, पोलादपूर तालुक्यातील पार्ले परिसरात केमिकल, स्टील, डिझेलच्या चोरीचा व्यवसाय सुरु आहे. तो माल काळ्या बाजारात विकला जातो. हे लोकांची सेवा कशी करणार? जिल्हा परिषदेला दलाल नकोत स्वच्छ चारित्र्याचा लोकप्रतिनिधी हवा आणि ते आमच्याकडे आहेत. आपत्ती आली की मदत होतेच पण काहींनी आपत्तीत संधी साधली. जनतेत प्रश्न आहे की काम करण्याऐवजी काहींचे छोटे बंधू पुढे कसे पोचले, काम प्रत्यक्षात न होता कागदावरच पैसे काढले. पिनकवाडी, केवनाळे तालुका पोलादपूर रस्ता व केवनाळे पुनर्वसनाची कामे जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकामं खात्यातून दाखवले. एकाच कामासाठी दोनदा बिले काढली. तिच कामे पुन्हा पुनर्वसन दाखवून तिसऱ्यांदा पैसे काढले. अशांना तुम्ही निवडून देणार का? नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्रस्थानी गेले १५-१६ वर्ष जिल्हा परिषदेच्या निधीतून दरवर्षी एक ते दीड कोटी सुशोभीकरणाच्या नावाखाली दाखविण्यात आले. पण इतक्या वर्षात नेमके काय बदलले हा जनतेचा प्रश्न आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र नावाचा वापर करूनही खोटी बिलं त्यांचा वारसदार सांगून काढताहेत श्रद्धेचे स्थान भ्रष्टाचाराचे कुरण बनविण्याचा अधिकार यांना कुणी दिला. मालुसरे यांच्या जन्मस्थळाचा प्रश्न मी विधिमंडळात मांडला आणि पाच कोटीची तरतूद करायला लावली. हे काम मी माझ्या मातीसाठी केले. शिक्षकांच्या बदल्यांच्या तक्रारी आहेत. २० दिवसांपूर्वी यांच्याच कार्यकर्त्यांनी उपोषण केल्याचे सर्वांनी पाहिले. शिक्षणावर सौदेबाजी करणाऱ्यांना तुम्ही जिल्हा परिषदेवर पाठवणार का? राजकीय दबाव वापरून अपूर्ण कामांची पाण्याची बिले काढणाऱ्यांना तुम्ही पाणी पाजणार की नाही? ” असा सवालही दरेकरांनी उपस्थितांना केला.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here