मुंबई
नरिमन पॉइंट येथील बजाज आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोककला चित्रप्रदर्शनास रविवारी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली.
‘थॉट्स अॅन इन्व्हायर्नमेंट’ या संकल्पनेवर आधारित या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जगप्रसिद्ध चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांच्या हस्ते पार पडले होते. शिक्षिका व चित्रकार माधुरी मधुकर मोहिते यांनी साकारलेल्या या चित्रप्रदर्शनात वारली, गोंड व मधुबनी या लोककलांच्या माध्यमातून निसर्ग, समाज आणि मानवी जीवनातील समतोल प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास, सामाजिक असमतोल आणि मानवी संवेदनशीलता यावर भाष्य करणारी ही चित्रे प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी ठरत आहेत. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा भगिनी जेहलम जोशी यांच्यासह प्रदर्शनातील चित्रांचे बारकाईने निरीक्षण करत कलाकारांचे मनःपुर्वक कौतुक केले.
लोककलेच्या माध्यमातून पर्यावरण व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच याच ठिकाणी उपस्थित असलेल्या ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ या नाट्यगटाला डॉ. गोऱ्हे यांनी भेट दिली. पर्यावरणपुुक संकल्पनांवर आधारित नाट्यप्रयोग सादर करून समाजात पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपुर्ण कार्य हा नाट्यगट करत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी चित्रकार माधुरी मोहिते, मधुकर मोहिते, शारदा साठे, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, प्रियांका कांबळे, रागिणी पाटील तसेच डॉ. विवेक कोरडे उपस्थित होते.






















