Home मुंबई *राज्यातील २० हजार तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी, शिष्टमंडळासोबत प्राथमिक चर्चा

*राज्यातील २० हजार तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी, शिष्टमंडळासोबत प्राथमिक चर्चा

61
0

*येत्या तीन महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्याचा प्रयत्न – मंत्री मंगलप्रभात लोढा*

मुंबई १४

राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्याचे रोजगार मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी दिली. जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी आज मंत्रालयात मंत्री लोढा यांची त्यांच्या दालनात शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची जपानमध्ये मोठी मागणी असून रोजगाराची संधी असल्याचे यावेळी झालेल्या प्राथमिक चर्चेत स्पष्ट झाले आहे.

कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख जपानच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे वरिष्ठ संचालक तोशिनोरी नाईतो, परदेशी मनुष्यबळ विभागाचे संचालक ईजी यामामोटो, तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे संचालक माकोतो ताकाहाशी, तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसाय विनिमय विभागाच्या प्रमुख हिरोए मिकामी यांचीही यावेळी उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान भाषांतराची जबाबदारी दुभाषी युका इगाराशी यांनी पार पाडली. होक्काईडो हा जपानच्या उत्तरेकडील प्रांत असून, जपानचा जवळपास २२ % भाग या प्रांताने व्यापला आहे. या प्रांतात कृषी, मत्स्य उद्योग, बांधकाम आणि पायाभूत सुविधा तसेच नर्सिंग क्षेत्रात मनुष्यबळाची नितांत गरज आहे. त्यानुसार कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी होक्काईडो प्रांताने आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रांताच्या शिष्टमंडळाने आज कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री लोढा यांची भेट घेतली.

मंत्री लोढा यावेळी म्हणाले की, जागतिक स्तरावर भारतीय मनुष्यबळ क्रियाशील ठेवण्यासाठी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचा कौशल्य विकासावर अधिक भर आहे, त्यादृष्टीने मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग कार्यरत असून विविध देशांमध्ये राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधिनीद्वारे योग्य कौशल्य प्रशिक्षण आणि जपानी भाषेचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही, मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

जपानमध्ये कृषी, वैद्यकीय, विविध तंत्रज्ञ, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे श्री कानो ताकायुकी यांनी सांगितले. तसेच भारतीय युवक अधिक कार्यक्षमतेने काम करत असून भारतीय कौशल्य प्रशिक्षित तरुणांना
जगभरात मोठ्या आदराने रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे गौरवोद्गार ही ताकायुकी यांनी यावेळी काढले. सध्या जपानच्या होक्काईडो प्रांतात आवश्यक असलेल्या मनुष्यबळावर या बैठकीत चर्चा झाली असून जपानमधल्या इतर प्रांतातही असलेल्या संधीची पुढील काळात चाचपणी करण्यात येणार आहे.

चौकट
मुंबई महापालिका निवडणुकीची धावपळ सुरु असताना देखील राज्यातल्या तरुणांना परदेशात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने मंत्री लोढा यांनी निवडणुकीची इतर कामे बाजूला सारून जपानी शिष्टमंडळासोबत चर्चा केली. निवडणुकीच्या काळात मंत्रालयात सर्वत्र शुकशुकाट असताना केवळ कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयात लगबग सुरु असल्याचे चित्र असल्याची चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here