*महात्मा जोतीराव फुले यांच्या १३५व्या स्मृतिदिनानिमित्त संविधानातून सामाजिक बांधिलकीचा संकल्प*
पुणे दि. २८ नोव्हेंबर २०२५ : महात्मा जोतीराव फुले यांच्या १३५व्या स्मृतिदिनानिमित्त फुलेवाडा येथे आयोजित कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि महात्मा फुले यांच्या कार्याच्या स्मरणातून समाजजागृतीचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला. विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महात्मा फुले यांच्या विचारांनी समाजाला समानतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या स्मृतिदिनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून आपण लोकशाहीच्या मूल्यांची पुनःप्रचिती करून देत आहोत. ‘ शाखा—तिथे संविधान’ ही मोहीम २५ नोव्हेंबरपासून सुरू केली असून ती वर्षभर चालणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे या कामाला अधिक बळ मिळाले आहे.” त्या पुढे म्हणाल्या की मुलांना पुस्तके-वह्यांचे वाटप, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम, तसेच निवडणूक प्रक्रियेत समाजातील तळागाळातील प्रश्नांना आवाज देणे हेही शिवसेनेचे प्राधान्य आहे.
ऐतिहासिक भिडे वाडा स्मारकाच्या अंतिम टप्प्यातील कामाला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख निलेश गिरमे (शिवसेना युवासेना व फुलेवाडा–भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समिती अध्यक्ष) यांनी केले. महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, शिवसेना प्रवक्ते व पत्रकार किरण सोनवणे, महाराष्ट्र युवा सेना अध्यक्ष किरण साळी, पुणे जिल्हा प्रमुख सोमनाथ कुटे, निलेश घारे, युवासेना उपशहर प्रमुख विशाल लोखंडे, कसबा मतदारसंघ अध्यक्ष ओंकार आढाव, उपाध्यक्ष अमोल कवितकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला आघाडीच्या कल्पना थोरात (महानगर प्रमुख), सुदर्शना त्रिगुणाईत (शहर सहसंपर्कप्रमुख), सुरेखा कदम-पाटील, मीनल धनवटे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन करून लोकशाहीचा मूल्याधारित संदेश देण्यात आला. दलित समाजाच्या जमिनींचे प्रश्न, महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणे—या सर्व बाबींवर आगामी अधिवेशनात लक्ष केंद्रित करण्याची बांधिलकीही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केली.
महात्मा फुले यांच्या विचारांना कृतीतून आदरांजली देत समाजात समतेचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.


















