Home Uncategorized *आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हजारो मनुष्यबळ आणि विविध उपकरणांच्या...

*आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हजारो मनुष्यबळ आणि विविध उपकरणांच्या साहाय्याने व्यापक मोहीम*

110
0

*• रात्रीच्या सत्रात ४०० हून अधिक तर दिवसा हजारो स्वच्छता कर्मचारी अविरतपणे कार्यरत*

*• आंदोलक बांधवांकडूनही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद*

*• आंदोलनस्थळी प्रखर प्रकाश झोत असलेल्या ४० दिव्यांचा समावेश असणारा मनोरा उभारला*

*• एका दिवसात सुमारे चार हजार आंदोलनकर्त्यांनी घेतला वैद्यकीय सुविधेचा लाभ*

आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हजारो मनुष्यबळ आणि विविध उपकरणांच्या साहाय्याने काल सोमवार मध्यरात्रीपासून व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रात्रीच्या सत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची कार्यवाही केली. तर,
मंगळवार सकाळच्या सत्रात १ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वच्छताकार्य सुरू केले आहे.

दरम्यान, मैदान आणि परिसरात स्वच्छता राखण्याकरिता सहकार्य करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलक बांधवसुद्धा कचरा संकलनासाठी सहकार्य करत आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडून आझाद मैदान आणि परिसरात पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालये आदी सोयी-सुविधाही योग्यप्रकारे पुरविण्यात येत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आझाद मैदान, महानगरपालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याठिकाणी पथक तैनात करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय (वॉर्ड) स्तरावरील यंत्रणा यात एकत्रितपणे सहभागी झाल्या आहेत. सुमारे १ हजारांहून अधिक स्वच्छता कर्मचारी तीन सत्रांमध्ये सातत्याने कार्यरत आहेत.
दि १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० ते दि २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजेदरम्यानच्या कालावधीत ४०० हून अधिक कर्मचारी अविरतपणे कार्यरत होते.
आझाद मैदान आणि परिसरामध्ये लवकरात लवकर स्वच्छता व्हावी आणि परिस्थिती पुर्वपदावर यावी, यासाठी दोन मिनी कॉम्पॅक्टर आणि एका लार्ज कॉम्पॅक्टरचा वापर करण्यात आला. कचरा संकलनाची ५ लहान आकाराची वाहनेही कार्यरत आहेत. कचरा संकलनासाठी महानगरपालिकेने आंदोलनस्थळी सुमारे २ हजार थैल्यांचे (dustbin bag) वितरण केले आहे. तसेच कचरा संकलनाच्या पेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आंदोलकांसाठी आझाद मैदान आणि परिसरात नियमित तसेच फिरती अशी दोन्ही प्रकारची मिळून ४५० पेक्षा अधिक शौचकुपे उपलब्ध आहेत. रात्रीच्या सत्रामध्ये सक्शन संयंत्राद्वारे तसेच जेट स्प्रे संयंत्रांचा वापर करून सर्व शौचकुपे स्वच्छ करण्यात आली आहेत.

तसेच दि २ सप्टेंबर सकाळ सत्रातदेखील स्वच्छता कार्यवाही करण्यातआली. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी समर्पित मनुष्यबळ कायमस्वरूपी उपलब्ध आहे.

*आंदोलनस्थळी पुरवण्यात आलेल्या इतर सोयी-सुविधा -*
● आंदोलनस्थळी प्रकाश व्यवस्थेसाठी प्रखर झोत असलेल्या ४० दिव्यांचा समावेश असलेला मनोरा मुंबई अग्निशमन दलामार्फत उभारण्यात आला आहे.

● आंदोलकांच्या सुविधेसाठी पाण्याच्या २५ टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. आझाद मैदान आणि परिसरात या टँकर्सद्वारे सातत्याने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये मिनी टँकर्स देखील समाविष्ट आहेत.

● आझाद मैदानावर स्वतंत्र वैद्यकीय कक्ष कार्यान्वित आहे. काल दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी एकाच दिवसात सुमारे ४ हजार आंदोलकांनी वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला . तसेच, ३५ आंदोलकांना नजीकच्या रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे.

●स्वच्छतेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी कीटकनाशक आणि जंतूनाशक भुकटी (powder) फवारणी करण्यात आली आहे.

● आझाद मैदान आणि परिसरात कीटक नियंत्रण विभागाच्या चमुमार्फत धूम्रफवारणी तसेच औषध फवारणी नियमितपणे करण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here