Home Uncategorized *पुराभिलेख दस्तऐवजांच्या संवर्धनास निधी कमी पडू देणार नाही : ना. अ‍ॅड. आशिष...

*पुराभिलेख दस्तऐवजांच्या संवर्धनास निधी कमी पडू देणार नाही : ना. अ‍ॅड. आशिष शेलार

78
0

पुणे, २० ऑगस्ट २०२५ – “पुराभिलेखांचे जतन करणे हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे कार्य असून, या कार्यास शासन निधी कमी पडू देणार नाही.”असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज येथे केले. येथील पुरालेखागार कार्यालयालास आज भेट देऊन त्यांनी पुरालेखागाराच्या कामकाजाची पाहाणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे पुरालेखागारात साधारणपणे चार कोटी ऐतिहासिक कागदपत्रे असून त्यात ३९,००० रूमाल आहेत. यामध्ये २९,४६३ मराठी रूमाल, ६४४ गुजराती रूमाल आणि १०,५१८ इंग्रजी फाईल्स समाविष्ट आहेत. या संग्रहामध्ये पेशवेकालीन रोजकिर्द, छत्रपती शाहू महाराज दप्तर, सातारा महाराज दप्तर, आंग्रे दप्तर, कर्नाटक दप्तर, प्रांत आजमास आणि जमाव दप्तर यासारख्या महत्त्वाच्या विभागांची कागदपत्रे आहेत.

ना.शेलार यांनी सांगितले की, “चाळीस लाख कागदपत्रे जीर्ण स्वरूपात असून, त्यांच्या संवर्धनासाठी तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कागदपत्रांवर टिश्यू पेपर लावून संरक्षण करण्याचे कामास प्रति पान ७५ रुपयांचा खर्च येतो. या व्यतिरिक्त वाळवी प्रतिबंधक धूमीकरण, आणि अन्य रासायनिक प्रक्रियांनी देखिल पुरातन कागदपत्रांचे जतन केले जाते. पुरालेखागाराच्या ऐतिहासिक इमारतीच्या जतन व संवर्धनासाठी पंधरा कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे. डिजिटायझेशन, मायक्रोफिल्मिंग आणि ऍसिड-फ्री बॉक्स यांसारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करून कागदपत्रांचे दीर्घकालीन जतन केले जात आहे.”

या पुरालेखागारातून वार्षिक १२ ते १५ लाख रुपयांचा महसूल गोळा होत असून, इनाम-वतन विषयक कागदपत्रे आणि लँड ॲलिनेशन उतारे न्यायालयीन कामकाजात पुरावा म्हणून वापरले जातात. मंत्री आशिष शेलार यांच्याकडे एकूण ४५ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आहे. एँड. आशिष शेलार यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. इतिहास संशोधकांसाठी हा अमूल्य खजिना असल्याचे त्यांनी नमूद केले. परदेशी संशोधक देखील येथे अभ्यासासाठी येत असल्याचे यावेळी त्यांना सांगण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालाही २० कोटीचा प्लँन तयार करा , असे निर्देश यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

यावेळी पुरालेखागाराच्या सहाय्यक संचालिका शैला जंगम यांच्यासह अभिलेखाधिकारी शैलेंद्र वाघ, वरीष्ठ सहाय्यक रवींद्र फडतरे, अभिलेखपाल सुनिता वाघमारे यांच्यासह पुणे पुरालेखागाराचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here