Home Uncategorized शिवचातुर्य दिनानिमित्ताने आग्रा ते राजगड पद यात्रेला प्रारंभ*

शिवचातुर्य दिनानिमित्ताने आग्रा ते राजगड पद यात्रेला प्रारंभ*

70
0

ना. एड आशिष शेलार यांनी यात्रेला दाखवला भगवा झेंडा

महाराष्ट्र शासनातर्फे हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार – ना आशिष शेलार

आग्रा
‘शिवचातुर्य दिना’चे औचित्य साधून ‘गरुडझेप मोहीम’ अंतर्गत रविवारी आग्रा येथून राजगडाकडे पायी व सायकल यात्रेचा शुभारंभ झाला. आग्र्याच्या लाल किल्ल्यासमोर या यात्रेतील सायकलस्वारांना राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री एड आशिष शेलार यांनी भगवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या.

औरंगजेबाच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज ज्या चातुर्याने आग्र्याहून राजगडावर पोहोचले होते , तो प्रवास आणि त्याचे ऐतिहासिक प्रेरणादायी महत्त्व जागृत करण्याच्या हेतूने, ही मोहीम आयोजित करण्यात आली .
दिनांक १७ ते २७ ऑगस्ट २०२५ या ११ दिवसांच्या कालावधीत ही सायकल यात्रा मशाल यात्रेसह राजगडावर पोहोचणार आहे.या यात्रेत सहभागी झालेल्या उत्साही सायकलस्वारांत बहुतांश ६० वर्षांचे ज्येष्ठही आहेत, तर त्यांच्यासोबत ७८ वर्षांच्या निरुपमाताई भावे यांच्यासह नऊ महिलांचा सहभाग ही या मोहिमेची विशेष बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन ही यात्रा सुरु झाली.

शिवचातुर्य दिनानिमित्त आग्रा येथील लाल किल्या समोरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर १०१ गड किल्ल्यांवरून आणलेल्या पाण्याने एड आशिष शेलार आणि आ. राहुल कुल यांच्या हस्ते अभिषेक करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन महाराजांना वंदन करण्यात आले.

यावेळी ना. आशिष शेलार म्हणाले की, “स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून झेप ही औरंगजेबाच्या साम्राज्याला दिलेली जबरदस्त चपराक होती. महाराजांच्या चातुर्य, पराक्रम आणि अद्वितीय धैर्याची ग्वाही देणारा हा दिवस जगाला प्रेरणा देणारा आहे. यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून यापुढे साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणार.”, अशी माहिती यावेळी मंत्री शेलार यांनी दिली.
तसेच गरुडझेप मोहीम संस्थेने आग्रा येथे शिवचातुर्य दिनाचा भव्य सोहळा आयोजित केला . या उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक मारुती गोळे आणि आयोजक मंडळी यांचे शेलार यांनी मनःपुर्वक अभिनंदनही केले.

या प्रसंगी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय, महाराष्ट्रातील आ. राहुल कुल, आ. संजय उपाध्याय, गरुडझेप मोहीम संस्थेचे संस्थापक मारुती गोळे, अध्यक्ष राकेश विधाते, पदाधिकारी तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

शिवचातुर्य दिन तारखेनुसार की तिथीनुसार यावर अद्याप सरकारी मोहोर उलटणे बाकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून तो दिवस निश्चित केला जाणार आहे असे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here