Home Uncategorized *’स्वाध्याय परिवारा’ चे लाखो तरुण पथनाट्यांद्वारे साजरी करणार जन्माष्टमी*

*’स्वाध्याय परिवारा’ चे लाखो तरुण पथनाट्यांद्वारे साजरी करणार जन्माष्टमी*

65
0

वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतो. भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत म्हणून दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. दादांची सुपुत्री आणि स्वाध्याय परिवाराची धुरा सांभाळणाऱ्या धनश्री श्रीनिवास तळवलकर यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात हे विचार घेऊन जात आहेत. जन्माष्टमीनिमित्त सादर होणाऱ्या या पथनाट्यांचा हा प्रयोग गेली २३ वर्षे अविरत सुरू आहेत.

यंदा देशभरातील १५ राज्यांत तसेच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, बँकॉक, आखाती देश यांसारख्या विविध २० पेक्षा जास्त देशांत मिळून युवकांच्या जवळपास १७,००० गट म्हणजे साधारण पावणे दोन लाख युवक ‘मिल गई मंज़िल हमें’ या पथनाट्यातून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. विविध भाषांमधून ही पथनाट्ये १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२५ या काळात सादर होत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय, अत्यंत निरपेक्षपणे आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून आणि या सर्वांतून वेळ काढून हे युवक पथनाट्य सादर करतात.

आपण सुखाच्या शोधात आयुष्यभर फिरतो परंतु नेहमी सुख आपल्या बाहेर शोधतो. बहुतेकवेळा सुख नक्की कशात आहे हे आपल्याला समजतच नाही. पण विश्व चालवणारी शक्ति आपल्यामध्ये वसली आहे आणि ती शक्ति माझ्या हृदयात राहून मला प्रेमाने सांभाळते, ही समजूत आली तर माणूस सुखाच्या पाठीमागे व्यर्थ पळणार नाही. त्या हृदयस्थ भगवंताच्या जाणिवेमुळे आपला जीवनाचा प्रवास निश्चित सुखाचा होईल, असा काही संदेश हे पथनाट्य देते.

आज दुर्दैवाने जन्माष्टमी फक्त दहीहंडीची उंची, थर आणि त्यासाठी लाखोंची बक्षिसे इतक्यावरच सीमित झाली आहे. श्रीकृष्ण आणि त्यांचे विचार जन्माष्टमी उत्सवात कुठे दिसतच नाहीत. अशा विपरीत काळात स्वाध्याय परिवाराच्या युवकांची जन्माष्टमीनिमित्त प्रतिवर्षी सादर होणारी ही पथनाट्ये काहीतरी सकारात्मक आणि रचनात्मक करण्याचा प्रयत्न करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here