*मागील सहा महिन्यात कॅम्पस मुलाखतीतून तब्बल १२ हजार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध*
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कांदिवली (पूर्व) येथे उभारलेले कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र हे मुंबई महानगरासह राज्यभरातील युवक-युवतींना रोजगाराच्या असंख्य वाटा खुल्या करुन देणारे दीपस्तंभ ठरत आहे. गत सहा महिन्यांत झालेल्या रोजगार मेळाव्यांतून तब्बल १२ हजार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली (पूर्व) येथे हे केंद्र उभारण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबत (NSDC) समन्वय साधण्यात आला. त्यानंतर उद्योग जगताच्या गरजा व प्रशिक्षण यामधील दरी भरून काढण्यासाठी या महामंडळासोबत (NSDC) सामंजस्य करार करण्यात आला आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने या केंद्राच्या संचालनासाठी मुख्य एजन्सी म्हणून भारतीय उद्योग परिसंघ (CII) यांना नियुक्त केले आहे.
*हे प्रशिक्षण उपलब्धः*
या केंद्रात युवक-युवतींना हॉटेल मॅनेजमेंट, विक्री आणि व्यवस्थापन, वातानुकूलन यंत्रणा दुरुस्ती, वस्त्र आणि कापड उद्योग, फोटोशॉप, थ्रीडी अॅनिमेशन, व्हीएफएक्स, सायबर सुरक्षा, जपान भाषा प्रशिक्षण, घरोघरी ‘फूड डिलिव्हरी’, मूलभूत संगणक प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आर्थिक साक्षरता अशा विविध क्षेत्रांबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते. हे सर्व प्रशिक्षण एका आठवड्यापासून एक महिन्यापर्यंतचे आहेत. त्यांनतर युवकांना दोन महिन्यांचे ऑन जॉब प्रशिक्षण देण्यात येते. मुलाखतीची तयारी कशी करावी, यासह व्यक्तिमत्त्व विकासाच्या पैलुंबाबत त्यांना सजग केले जाते.
*प्रशिक्षणाची गुणवत्ता:*
या केंद्रात दरवर्षी सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. तसेच NASSCOM, अॅपरेल सेक्टर स्किल कौन्सिल, सीआयआय फाउंडेशन, एमसीसी, बजाज, कॉसमॉस क्रिएटिव्ह अकॅडमी, ब्लू स्टार, आयटीसी हॉटेल्स यांसारख्या ख्यातनाम संस्थांमार्फत आधुनिक सुविधांचा वापर करून प्रशिक्षण दिले जात आहेत.
*असा घ्या प्रवेशः*
ज्या प्रशासकीय विभाग (वॉर्ड) मधील विद्यार्थी / व्यक्ती या केंद्रात प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असतील त्यांनी संबंधित विभाग कार्यालयात तसेच ८४५२९४५४३९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी केले आहे.
*


















