Home Uncategorized *लोणावळा बलात्कार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल*

*लोणावळा बलात्कार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल*

70
0

लोणावळा दि. २८ जुलै २०२५ : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात घडलेल्या तरुणीवरील बलात्कार या संतापजनक घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी पीडित तरुणीची भेट घेऊन तिला मानसिक आधार देत, आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

घटना शुक्रवारी (दि. २६ जुलै) रात्री नऊच्या सुमारास घडली. रस्त्याने घरी जात असलेल्या २३ वर्षीय तरुणीला नराधमानी कारमध्ये ओढून घेतले आणि तिच्यावर रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. अवघ्या १२ तासांत एका संशयिताला अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या नेतृत्वाखाली तपासकार्य सुरु आहे.

अशा घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वपूर्ण बाबी अधोरेखित केल्या आहेत . पोलीस यंत्रणेने रात्रीच्या वेळेस निर्जन भागात अधिक गस्त वाढवणे, तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यक्षम सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून त्याचे नियंत्रण केंद्र सुनिश्चित करणे, महिला सुरक्षिततेसाठी कार्यरत हेल्पलाइन क्रमांक अधिक सक्रिय व परिणामकारक करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

डॉ. गोऱ्हे यांनी हेही सुचवले की, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था व पोलीस विभागांनी यांनी एकत्रित समन्वय साधून महिला सुरक्षेसाठी एक व्यापक कृतीआराखडा तयार करावा. महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती मोहिमा, शाळा–महाविद्यालयांतून स्वसंरक्षण प्रशिक्षण व स्थानिक पातळीवरील महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करणे या उपाययोजनांवर त्यांनी भर दिला आहे.

लोणावळा परिसरात यापूर्वीही काही महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या घटनेतील दोषींवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here