*• व्यावसायिक मार्गांच्या (कमर्शियल स्ट्रीट) ठिकाणी आस्थापनांच्या तळमजल्यातील वाहनतळांचा गैरवापर होत असल्यास अकस्मात भेटी देऊन दंडात्मक कारवाई करावी*
*• बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश*
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही बाबींसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असतील तर, त्यांना त्या तक्रारीची सद्यस्थिती सहज जाणून घेता येईल, अशी व्यवस्था असावी. तसेच, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे. मुंबईतील सुलभ वाहतूक आणि नागरिकांच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने आणि भंगार / टाकाऊ साहित्य तत्काळ निष्कासित करावे. व्यावसायिक मार्गांच्या (कमर्शियल स्ट्रीट) ठिकाणी असलेल्या आस्थापनांना तळमजल्यात वाहनतळ परवाना देण्यात आला असुनही त्या जागेचा वापर इतर कारणांसाठी केला जात असल्याचे आढळून येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अकस्मात भेटी देऊन तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून केल्या जाणाऱ्या रस्ते काँक्रिटीकरणासंबंधी नागरिकांसाठी आगाऊ स्वरुपात म्हणजे दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी माहिती सार्वजनिक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विविध योजना, प्रकल्प आदींची तयारी आणि उपाययोजना तसेच त्यातील अडचणी आदींबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यान (भायखळा) येथे आज (दि २३ जुलै २०२५) पार पडली. यावेळी गगराणी यांनी हे निर्देश दिले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सह आयुक्त (दक्षता) डॉ. गंगाधरण डी. यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सह आयुक्त, उपायुक्त, संचालक, सहायक आयुक्त, विभाग प्रमुख, खाते प्रमुख आदी या बैठकीस उपस्थित होते.
विविध विभागातील महत्वपूर्ण उपक्रम, सद्यस्थिती आणि उपाययोजना आदींचा आढावा प्रत्येक विभाग तसेच खात्यांकडून घेण्यात आला. त्यानंतर खालील बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच भूषण गगराणी यांनी खालीलप्रमाणे निर्देश आणि सूचना दिल्या.
■ तक्रार निवारणाची व्यवस्था नागरिकांसाठी सुलभ, सुरळीत असायला हवी. त्यांना तक्रारींची सद्यस्थिती जाणून घेता येईल, अशी व्यवस्था करावी. तसेच, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे.
■ दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून केल्या जाणाऱ्या रस्ते काँक्रिटीकरणासंबंधी नागरिकांसाठी आगाऊ स्वरुपात म्हणजे दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी माहिती सार्वजनिक करण्यात यावी.
■ रस्त्यांची कामे झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव रस्ते नव्याने खोदले जाऊ नयेत. तसेच, रस्ते खोदण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी देऊ नये.
■ सध्या अस्तित्वात असलेले आणि उत्तम स्थितीत असलेले पदपथ तोडू नयेत.
■ यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचण्याची काही ठिकाणे समोर आली आहेत. तसेच पायाभूत सुविधांच्या कामकाजामुळे काही ठिकाणी पाणी साचत असल्याचे आढळून आले आहे, त्याठिकाणी त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात.
■ मा. न्यायालयांच्या निर्देशांनुसार, धोकादायक इमारती निष्कासित करण्यासाठी कारवाई करावी.
■ स्वच्छतेच्या बाबतीत सहायक आयुक्त स्तरावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण होणे गरजेचे आहे. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण आदी सेवा-सुविधांची पूर्तता ही महानगरपालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. त्यामुळे या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यस्थळी पाहणी करून वेळोवेळी अंमलबजावणी करावी.
■ अरुंद परिसरात आग लागल्यास त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या यंत्रणा पोहोचण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी.
■ वर्दळीची ठिकाणे, रेल्वे स्थानक परिसर हे फेरीवाला मुक्त करण्यासाठी संबंधित विभाग (वॉर्ड) वगळता इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या साहाय्याने विशेष मोहीम राबवावी.
***

















