मुंबई
वातावरणीय बदलासंदर्भातील दोन्ही सभागृहांच्या संयुक्त तर्द्थ समितीचा कार्यारंभ आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती आणि या समितीचे समितीप्रमुख प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. समिती सदस्यांनी आजच्या प्रारंभिक बैठकीत यापुढील काळात समितीचे कामकाज अधिक प्रभावी आणि निर्णयाभिमुख व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत महत्वपूर्ण सूचना केल्या.
प्रा.राम शिंदे यांनी या सूचनांचे स्वागत केले. “समितीच्या यापुढील बैठका नियमित स्वरुपात होतील तसेच पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि वातावरणीय बदलासंदर्भातील उपाययोजना, धोरणनिश्चिती यादृष्टीने आपल्याला महत्वपूर्ण योगदान द्यायचे आहे”, असे स्पष्ट केले.
या प्रारंभिक बैठकीस दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य सर्वश्री रणधीर सावरकर, विक्रम पाचपुते, भिमराव तापकीर, देवराव भोंगळे, धर्मरावबाबा आत्राम, आदित्य ठाकरे, डॉ. ज्योती गायकवाड, निरंजन डावखरे, राजेश राठोड, सुनिल शिंदे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-3 डॉ.विलास आठवले, सचिव-4 शिवदर्शन साठ्ये, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे रविंद्र आंधळे, “माझी वसुंधरा अभियान” चे संचालक सुधाकर बोबडे, वातावरणीय बदल कृती समितीचे संचालक अभिजित घोरपडे, संचालक अभय पिंपरकर उपस्थित होते. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे या समितीचे सह समितीप्रमुख आणि
उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे या समितीच्या विशेष निमंत्रित सदस्या आहेत.
***






















