*”पोलिसांची ही कारवाई वैष्णवीला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
पुणे, दि. ३० मे २०२५ : वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत संबंधित आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. या घटनेवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसांची ही कारवाई अत्यंत आवश्यक होती असे स्पष्ट केले आहे.
“उशिरा का होईना, पण पोलिसांनी त्याच्यापर्यंत पोहोचून योग्य पाऊल उचलले. यामधून महत्त्वाचे धागेदोरे समोर येतील आणि पुढील तपासाला दिशा मिळेल,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
तसेच, या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली. “नुकतेच चौंधे नावाच्या व्यक्तीच्या पत्नीने केलेल्या तक्रारीत उल्लेख आहे की, चौंधे, निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील आरोपी लॅपटॉपवर मुलींचे फोटो पाहून त्यातून मुलींची निवड करत असत. हे अत्यंत धक्कादायक आहे आणि या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे सूचित करते,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
या गुन्ह्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “या प्रकरणात उच्चपदस्थांचा दबाव असल्याचा संशय अनेकांच्या मनात आहे. पण आता तोही दूर होईल, अशी आशा आहे,” असे त्या म्हणाल्या.
डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणावर फोनवर सादर केली असून, मा. मुख्यमंत्री महोदयांनी ऊचित कारवाईचे आश्वासन दिले असल्याचेही डॅा.नीलम गोर्हेनी सांगितले.
“पोलिसांनी घेतलेली ही कारवाई वैष्णवीला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल,” असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
















