Home Uncategorized *दादर व चेंबूर येथील जलतरण तलावांमध्ये मिळणार पोहण्याचे प्रशिक्षण*

*दादर व चेंबूर येथील जलतरण तलावांमध्ये मिळणार पोहण्याचे प्रशिक्षण*

93
0

*पहिल्या सत्रासाठी दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी तर दुसऱ्या सत्रासाठी दिनांक ६ मे २०२५ पासून ऑनलाईन नावनोंदणी*

*इतर ९ जलतरण तलावांवर मासिक, त्रैमासिक सभासदत्वाच्या सुविधेचा प्रारंभ*

उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईकरांना जलतरणाचे अर्थात पोहण्याचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पोहण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या उत्तम व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नव्याने सभासद नोंदणीची सुविधा देखील सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर (प) येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव आणि चेंबूर (पू) येथील जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव या दोन्ही जलतरण तलावांवर उन्हाळी सुट्टी दरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. दिनांक २ मे २०२५ पासून २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. तर याच प्रशिक्षणाच्या दुसऱ्या कालावधीचा प्रारंभ दिनांक २३ मे २०२५ पासून होणार आहे. प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठीची लिंक सोमवार, दिनांक २१ एप्रिल २०२५ सकाळी ११ वाजेपासून कार्यान्वित होणार आहे. तसेच इतर जलतरण तलावांवर मासिक, त्रैमासिक सभासदत्वाची सुविधा नव्याने उपलब्ध होणार आहे.

मुंबईकर नागरिकांना जलतरण या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे ११ तरण तलाव कार्यरत आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने अनेक इच्छुक या क्रीडा प्रकारापासून लांब राहतात. पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंक सोमवार, दिनांक २१ एप्रिल २०२५ पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती उप आयुक्त (उद्याने) श्री. अजित आंबी यांनी दिली आहे.

या दोन्ही जलतरण तलावात प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी केली जाणार आहे. पंधरा वर्षांपर्यंतची मुले, ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी २ हजार २१० रूपये, तर १६ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी ३ हजार ३१० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. दादर आणि चेंबूर येथील दोन्ही जलतरण तलावांमध्ये दररोज तीन सत्रांमध्ये जसे की दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३.३० आणि दुपारी ३.३० ते ४.३० अशाप्रकारे प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षणाच्या नोंदणीसाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दादर आणि चेंबूर वगळता इतर ९ जलतरण तलावांमध्ये दिनांक नागरिकांच्या सुविधेसाठी मासिक, त्रैमासिक सभादत्वाची सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्याची नोंदणी दिनांक २१ एप्रिल २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे. सदर विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्द्तीनेच होणार आहे. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

*मासिक, त्रैमासिक सभादत्वाची सुविधा असलेल्या तलावांचा तपशील पुढीलप्रमाणे :-*
कांदिवली (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिंपिक जलतरण तलाव
दहिसर (पश्चिम) येथील श्री भावदेवी कांदरवाडा जलतरण तलाव
दहिसर (पूर्व) येथील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव
मालाड (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
गिल्बनर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
अंधेरी (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
वरळी येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
विक्रोळी (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
वडाळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here