*लातूरमध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक — महिला, शालेय सुरक्षा, ऊसतोड कामगार, वनीकरण आणि शेतकरी प्रश्नांवर चर्चा*
*“शाळांमध्ये ‘गुड टच – बॅड टच’चे प्रशिक्षण द्या, बाल शोषण रोखण्यासाठी दक्षता यंत्रणा उभी करा” — डॉ. नीलम गोऱ्हे*
*“ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचे नियमित वाटप करा” — डॉ. गोऱ्हे*
लातूर, दि. ४ एप्रिल : “भूकंपग्रस्त भागातील वनीकरण, महिलांचे संरक्षण, मुलांचे शिक्षण आणि शेतकऱ्यांचे हित यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत,” असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
या बैठकीस लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*भूकंपग्रस्त भागातील सामाजिक वनीकरणावर भर*
डॉ. गोऱ्हे यांनी भूकंपग्रस्त गावांमध्ये सामाजिक वनीकरणाच्या सुसंगत अंमलबजावणीसाठी SOP (Standard Operating Procedure) तयार करण्याचे निर्देश दिले. ओपन जिम, नाना-नानी पार्क आणि गवती रस्त्यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणीही शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचा भाग म्हणून करावी, असे त्यांनी नमूद केले.
*कायदा-सुव्यवस्था आणि अमली पदार्थविरोधी उपाययोजना*
लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. महाविद्यालयांमध्ये नशाबंदी व व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती उपक्रम राबवण्याचेही त्यांनी आवाहन केले.
त्याचबरोबर ‘सखी सावित्री’ योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना ‘गुड टच – बॅड टच’चे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात यावा. बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी दक्षता समित्यांसह माहिती यंत्रणा विकसित करावी. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची उपलब्धता, ‘भरोसा सेल’ची सक्रीय कार्यवाही, अपहरण व बेपत्ता मुलींच्या प्रकरणांवर लक्ष, तसेच अल्पवयीन मुलींच्या शोषणास प्रतिबंध करण्यासाठी अटी घालण्याचे निर्देश त्यांनी दिले.
*ऊसतोड कामगार महिला व त्यांच्या मुलांसाठी सुविधा*
लातूरमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चार वसतिगृहे आहेत यामध्ये दोन मुलांची व दोन मुलींची अशी ही वसतीगृहे आहेत. हे पाहता वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलींना नियमित सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरण व सुट्ट्यांमध्ये आगाऊ वाटपाचे नियोजन करण्याचे आदेश डॉ. गोऱ्हे यांनी दिले. पोलीस अधीक्षकांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.
*शेती व पीक विमा यासंदर्भातील अडचणींवर चर्चा*
रेनापूर व चाकूर येथे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सोलापूर एसबीआय इन्शुरन्सकडून कृषी अधिकाऱ्यांना पीक विमा संबंधित डेटा न दिल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली.
त्याचवेळी लातूर जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचे निरीक्षण आल्याने डॉ. गोऱ्हे यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
या बैठकीत एकूणच महिला सुरक्षा, बाल कल्याण, वनीकरण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बहुआयामी चर्चा झाली.


















