*सिंधुदुर्ग दिनांक ३ ऑगस्ट २०२६*
“चंद्रकांतदादा पाटील हे खऱ्या अर्थाने संस्कारमय आणि आदर्श व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आयुष्यभर समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे समाज कधीही मान्य करणार नाही,” असा घणाघात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली होती. या टीकेला महसूल मंत्री बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वडेट्टीवार यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आणि चंद्रकांतदादा पाटील यांचे खंबीरपणे समर्थन केले.
महसूल मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, “चंद्रकांतदादा पाटील हे आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. विद्यार्थी दशेपासून त्यांनी धर्म, संस्कृती, देव आणि देशासाठी स्वतःला समर्पित केले आहे. अशा ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेतृत्वावर टीका करून विरोधक आपली पातळी घसरवत आहेत. कोणताही सुजाण नागरिक किंवा समाज अशा प्रकारची टिप्पणी स्वीकारणार नाही.” विरोधकांनी मुद्द्यांची मांडणी सोडून वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणे थांबवावे, असा सल्लाही यावेळी महसूल मंत्र्यांनी दिला.
















