जेव्हा डफ बोलतो..नाद घुमतो..- शीतल हरीश करदेकर
शाहिरी ही करमणूक नव्हती. ती शस्त्र होती.
डफावरची थाप म्हणजे अन्यायाच्या छाताडावर घाव होता.
पण आज? आज तीच शाहिरी रील्स मध्ये नाचतेय.
*१. अमर भूपाळी १९५१ – साम्राज्य कोसळण्याचा आवाज*
वैशिष्ट्य: व्ही. शांताराम यांनी इतिहास कॅमेऱ्यात कैद केला.
या कथेतला दम काय तर एकीकडे मराठेशाही बुडतेय. दुसरीकडे होनाजी ‘घनःश्याम सुंदरा’ म्हणत पहाट वाचवतोय.
शेवटचा प्रसंग बघा – शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा झेंडा. आणि खाली होनाजींचे अश्रू.
हा सिनेमा नव्हता. हा मराठ्यांच्या पराभवाचा दस्तऐवज होता.
शाहिरी नजाकत: _”लटपट लटपट”_ मध्ये देह होता, पण ‘घनःश्याम’ मध्ये धर्म होता.
२. संगीत होनाजी बाळा १९५४ – शब्दांची तलवार होती.
वैशिष्ट्य काय तर चिं. य. मराठे यांचं नाटक आणि रंगमंच म्हणजे रणांगण होतं.
कथेतला दम काय तर होनाजी लिहायचा, बाळा गायचा. ही जोडी म्हणजे तर मराठी अस्मितेची ग्वाही!
शाहिरी नजाकत: “सखे गुले अनार” ही रागदारीची लावणी. अश्लीलता शून्य आणि इज्जत शंभर टक्के होती.
३. राम जोशी १९४७ – लावणीला मिळालेला राजमुकुट
वैशिष्ट्य काय तर लावणीला फडावरून दरबारात नेलं.
कथेतला दम काय असतो ते राम जोशींनी सिद्ध केलं . काय सांगितलं तर लावणी म्हणजे नुसता नाच नाही. ती बुद्धीची लढाई आहे.
४. पिंजरा १९७२ – तमाशाचे काळे सत्य
वैशिष्ट्य काय तर हे फक्त ग्लॅमर नाही तर घाण आहे, भूक आहे, मजबुरी आहे. कलावंताची -शिक्षकाची !
कथेतला दम काय तर श्रीराम लागूंचा फडावरील प्रवेश – तो अभिनय नाही. तो एका पिढीचा पराभव आहे.
५. सुगंधी कट्टा १९७४ – डफावरचा देशद्रोह आणि देशभक्ती*
वैशिष्ट्य काय तर हा जगातला एकमेव सिनेमा जिथे तमाशा क्रांतीसाठी वापरला.
कथेतला दम काय तर ‘नाचू किती नाचू” म्हणत जयश्री गडकर फक्त नाचत नाहीत तर देश वाचवतात.
६. महाराष्ट्र शाहीर २०२३ – शेवटचा जिवंत पोवाडा
वैशिष्ट्य काय तर शाहीर साबळे! डफ हात आणि इतिहास तोंडात.
कथेतला दम काय तर नेहरूंसमोर पोवाडा आणि नेहरू उभे राहून टाळ्या वाजवतात. तो सीन म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान!
शाहिरी नजाकत: ‘जय जय महाराष्ट्र माझा’_ – हे गीत नाही. हे राज्यगीत आहे. कारण त्यात रक्त आहे.
——
*● इतिहासाचा हिसाब ●*
पुर्वी शाहिरी प्रश्न विचारायची. ‘राजा नागवा आहे’ म्हणायची हिंमत होती.
आज शाहिरी उत्तर देते. ‘साहेब तुम्हीच राजा’ म्हणते.
पुर्वी डफावर अन्यायाची गोष्ट व्हायची.
आज डफावर फक्त जाहिरात होते.
●आणि सर्वात मोठं दुःख:
आजही आंदोलनात डफली वाजते. क्रांतीची गाणी म्हटली जातात.
पण त्या डफलीला लगेच जातीचा शिक्का, वादाचा रंग लावला जातो.
शाहिरीचा आवाज दाबला जात नाही, त्याला पेटीत बंद केलं जातं.
म्हणजे डफ बोलायचा बंद झाला नाही तर
आपण त्याला बोलू दिलं नाही.
आजच्या काळातही जिवंत कलेची गरज तितकीच आहे. म्हणूनच
डफ पुन्हा उचला. इतिहास पुन्हा लिहा! डफ वाजला की..नाद घुमतोच.. तो एक उर्जा देतो .प्रेरणा देतो..
*#जेव्हा_डफ_बोलतो #शाहिरी #मराठी_सिनेमा #होनाजी_बाळा #शाहीर_साबळे*
—

















