कोल्हापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे दोन बेपत्ता मुली सुखरूप सापडल्या – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
मुंबई : शनिवार, दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ च्या सुमारास विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुणे-मुंबई प्रवासात असताना त्यांना तळेगाव परिसरातील एका पित्याचा फोन आला. त्यांची मुलगी आणि तिची मैत्रीण घरात किरकोळ वाद झाल्यानंतर निघून गेल्या होत्या, आणि त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. संध्याकाळी एका ओळखीच्या व्यक्तीस त्यांच्याकडून फोन आला होता, परंतु त्यानंतर कोणतीही माहिती मिळाली नव्हती.
ही बाब लक्षात घेत नीलमताई गोऱ्हे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) यांना त्वरित संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महेंद्र पंडित यांनी मुलींचा त्वरित शोध घेतो अशी ग्वाही नीलमताई गोऱ्हे यांना दिली व तातडीने पथके रवाना केली आणि मुलींच्या शोधासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली. तसेच, मुलींच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली.
त्यानंतर रात्री १०.३० वाजता मुलींच्या वडिलांचा फोन डॉ. नीलम गोऱ्हे यांना आला. ‘दोन्ही मुली कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर सुखरूप आढळल्या आहेत ‘असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनीही या घटनेची पुष्टी करत सांगितले की, ‘मुली सुरक्षित आहेत. ज्या महिलेच्या फोनवरून मुलींनी संपर्क साधला होता, तिचीही चौकशी करून खात्री करण्यात आली आहे.’
सध्या दोन्ही मुली महिला पोलिसांच्या देखरेखीखाली निरीक्षणगृहात सुरक्षित असून, त्यांचे पालक कोल्हापूरला पोहोचले आहेत.
या संदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आपण योग्य वेळी लक्ष घातले तर, मोठ्या दुर्घटना टाळू शकतो. कोल्हापूर पोलिसांनी वेगवान आणि प्रभावी कृती केली, त्यामुळे मुली सुखरूप सापडल्या. या तत्परतेबद्दल महाराष्ट्र पोलीस ,SP कोल्हापूर पोलीस दल,आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले आहेत.






















