Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *‘आपलं गाव’ संकल्पना सरकारने तालुकास्तरावर* *राबविण्याची मागणी आगामी अधिवेशनात करणार* ...

*‘आपलं गाव’ संकल्पना सरकारने तालुकास्तरावर* *राबविण्याची मागणी आगामी अधिवेशनात करणार* *साताऱ्यातील कार्यक्रमात आ. प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन*

21
0

सातारा – ‘आपलं गाव’ हे करमणुकीचे, पर्यटनाचे ठिकाण नाही. झोकून देऊन काम करणे ज्याला म्हणतात ते या वनलक्ष्मी पर्यटन सेवा केंद्राच्या माध्यमातून नंदकुमार काटकर करत आहेत. हा केवळ उपक्रम नाही तर ही एक चळवळ, अभियान आहे. शहरातून गावाकडे जाऊन ‘आपलं गाव’ नावाची संकल्पना गती घेण्याची गरज आहे. आगामी अधिवेशनात ‘आपलं गाव’ ही संकल्पना राज्य सरकारने तालुकास्तरावर राबवावी, अशी आग्रही मागणी करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी सातारा येथील कार्यक्रमात बोलताना केले.

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताह’ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आज सातारा जिल्ह्यातील श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र ‘आपलं गाव’ मु. पो. बेलदरे, ता. कराड येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. दरेकर बोलत होते.

याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबईतील सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी, नितीन बनकर, आनंदराव गोळे, विष्णू घुमरे, अनिल गजरे, संचालिका कविता देशमुख, शिल्पा सरपोतदार, जयश्री पांचाळ, कराड पशुसंवर्धनचे सहाय्यक आयुक्त डॉ. एम.डी. पवार, पाटण पशुसंवर्धनचे सहाय्यक आयुक्त डॉ. एम. बी. चव्हाण, कराड पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील, सातारा पशु चिकित्सा व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष डॉ. विलास पाटील, पाटण भाजपा सरचिटणीस निवासूराव शिंदे, चंद्रकांत वंजारी, जिल्हा परिषद सदस्य धनंजय ताटे, बेलदरे ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण शिंदे आणि कार्यक्रमाचे आयोजक व मुंबई जिल्हा बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांसह मोठ्या संख्येने महिला, शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, आषाढीच्या मुहूर्तावर एक आगळावेगळा कार्यक्रम नंदकुमार काटकर यांनी आयोजित करून चांगला संदेश समाजमनात दिला आहे. अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी, परंतु आज आपल्याला एकाची जयंती व दुसऱ्याचा वाढदिवस साजरा करावा लागत आहे. या दोन्ही नेत्यांनी राज्याचा कारभार चालवत असताना एका विश्वासाने, मित्रत्वाच्या नात्याने राज्याला पुढे नेण्याचे काम केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आज अजित पवारांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांना शेतकरी, गोमातेविषयी, पर्यावरणाविषयी वेगळी आस्था आहे. त्यामुळे नंदकुमार काटकर यांनी अत्यंत योग्य असा कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमात अनेक विविधता आहेत. वृक्ष लागवड, पर्यावरणाला फार महत्त्व आलेय. येणारी संकटे ही पर्यावरणाची आहेत. निसर्गावर सर्व काही अवलंबून आहे. वृक्षारोपणाला महत्त्व देऊन झाडे लावणे, वृक्ष दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घेऊन त्याचा प्रचार, प्रसार करणे व गोमातेपासून निर्माण होणाऱ्या पदार्थापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधे, वस्तू निर्माण करणे असा कार्यक्रम येथे होतोय हा समाजाला चांगला संदेश असल्याचे आ. दरेकरांनी म्हटले.

दरेकर पुढे म्हणाले की, पशुसंवर्धन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. गाईंकडे कुणाचे लक्ष नव्हते. गाय ही किती उपयुक्त पशु आहे हे कुणाला माहीत नव्हते. देवाभाऊंनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिला. चाऱ्यासाठी पन्नास रुपये प्रति गाई मागे देण्याचे काम केले व गोसेवा आयोग आणून त्याला महत्त्व व प्राधान्य दिले. मोठ्या शहरात कितीही इंडस्ट्री, उद्योग येऊ देत, जोपर्यंत गावाकडचा शेतकरी अन्नधान्य, फलोत्पादन, भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर करत नाही व जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही. विकासाची गंगा शहराकडे नव्हे तर गावाकडे नेण्यासाठी मोठी भूमिका मुख्यमंत्र्यांनी हाती घेतली आहे. पशुसंवर्धनाबाबत मंत्र्यांशी चर्चा करून या विभागाकरिता जास्तीचा फंड राज्य सरकारकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांचे गावकुसावर लक्ष आहे. महिलांना शेतकरी म्हणून दर्जा देऊन त्यांचा सन्मान केला. तुमच्या गावाच्या विकासासाठी जेथेजेथे बोलण्याची आवश्यकता असेल तिथे बोलेन, असा शब्दही यावेळी दरेकरांनी दिला.

*नाशिकच्या निवृत्त सैनिकाने ५०० एकर*

*जागेत उभे केले ‘आपलं गाव’सारखेच मॉडेल*

आ. दरेकर म्हणाले कि, आपलं गाव सारखेच एक मॉडेल नाशिकला मालेगाव सारख्या ठिकाणी आदिवासी समाजातील साधा माणूस असलेल्या डॉ. शिवाजीराव गोळे यांनी पाचशे एकरच्या जागेत उभे केले आहे. मिलेक्ट्रीतून निवृत्त झाल्यावर शिवाजीराव हे गावाला आले. गावच्या मातीचे पांग फेडायचे म्हणून येथे काहीतरी केले पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी पाचशे एकराच्या शेतीत सर्व प्रकारची लागवड केली. पिकणाऱ्या सर्व गोष्टींची प्रोसेसिंग, पॅकिंग करून त्या वस्तू निर्यात केल्या. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली. मन की बात मध्ये सुमारे साडे तीन मिनिटे त्यांनी गोळे यांच्या आपले गाव संकल्पनेवर चर्चा केली. गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी गेले. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात अशी केंद्रे उभी राहिली तर आपल्या देशाला कुणाची गरज भासणार नाही. आत्मनिर्भर कृषी कसे असावे हे आपलं गाव या अभियानातून दिसून येईल, असेही दरेकरांनी स्पष्ट केले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here