Home Uncategorized धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठरतोय मुंबईचे भूषण

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठरतोय मुंबईचे भूषण

91
0

*मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचे रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण*

*सोमवार, दिनांक २७ जानेवारी २०२५ पासून मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत राहणार खुला*

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे मुंबईच्‍या आंतरराष्ट्रीय नावलौकीकात भर पडली आहे. या किनारी रस्‍ता प्रकल्‍पामुळे इंधन आणि वेळेची बचत होण्‍याबरोबरच प्रदूषण कमी होण्‍यास मदत होणार आहे. मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पातील एका भागाचे सुशोभीकरण सुरू असून ७० हेक्‍टर क्षेत्रावर हरित क्षेत्र विकसित केले जाणार आहे. एकूणच, मुंबईचे भूषण म्हणूनच मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाकडे आपल्याला पाहता येईल,असे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दिनांक २६ जानेवारी २०२५) करण्‍यात आले. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पण देखील यावेळी करण्‍यात आले. त्‍यानंतर ते प्रसार माध्‍यम प्रतिनिधींसमवेत बोलत होते. सोमवार, दिनांक २७ जानेवारी २०२५ पासून मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्‍यमंत्री कार्यालयाच्‍या प्रधान सचिव आश्विनी भिडे, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, मुंबई उपनगर जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उप आयुक्‍त ( विशेष अभियांत्रिकी) यतिन दळवी, मुख्‍य अभियंता (किनारी रस्‍ता प्रकल्‍प) मांतय्या स्‍वामी यांच्‍यासह विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. या रस्त्याचे दुभाजक सुशोभीकरण करण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
हे सुशोभीकरण मेसर्स टाटा सन्स लिमिटेड ॲण्ड अफेलेटसकडून करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाच्‍या उत्तर वाहिनी पूल आणि इतर तीन आंतरमार्गिकेचे लोकार्पण करत आहोत. मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्या सोमवार दि. २७ जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्ह कडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश आहे. आता केवळ एक आतंरमार्गिकेची जोडणी व्‍हायची आहे. फेब्रुवारी अखेरिस ही आंतरमार्गिकादेखील नागरी सेवेत रूजू होईल. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने १४ हजार कोटी रुपये खर्च करून हा किनारी रस्ता तयार केला आहे. मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍प विकसित करणा-या बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि त्यांच्या चमूचे, अभियंत्‍यांचे अभिनंदन करतो, असेदेखील मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले की, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्‍प(दक्षिण) अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामामुळे आपण परदेशात आहोत, अशी जाणीव निर्माण होते. नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या उत्‍तर वाहिनी पुलाच्‍या आणि इतर तीन आंतरमार्गिकांच्‍या लोकार्पणामुळे राजीव गांधी सागरी सेतू (सी लिंक) ते वरळी मरीन ड्राईव्ह दरम्‍यानचा प्रवास अवघा १० ते १२ मिनिटात होणार आहे. त्यामुळे वेळ, इंधन बचतीबरोबरच मुंबईकरांचे जीवनमान सुसह्य होणार आहे. मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडविण्‍याचे काम शासनाकडून केले जात आहे. किनारी रस्‍ता प्रकल्‍पाचे कामकाज वेळेत पूर्ण करणारे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते अभिनंदनास पात्र आहेत, असेदेखील श्री. शिंदे म्‍हणाले.

*दिनांक १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ५० लाख वाहनांनी ये-जा*

मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची ९४ टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून दिनांक १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ५० लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.

*बो आर्च स्ट्रिंग गर्डर (उत्तर वाहिनी मार्गिका) खुली केल्यानंतर खालील मार्ग वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.*

– मरीन ड्राईव्हकडून मुंबई किनारी रस्ता मार्गे सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक ही लोकार्पण होत असलेल्या उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार आहे.

– यापूर्वी मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक ही दक्षिण वाहिनी पुलावरून सुरू ठेवली होती. मात्र त्यासाठी आता उत्तर वाहिनी पूल उपलब्ध झाला आहे. परिणामी दक्षिण वाहिनी पुलाचा वापर नियमित दिशेने म्हणजेच वांद्रेकडून मरीन ड्राईव्हकडे येण्यासाठी करता येईल.

– मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे किनारी रस्यावरून जाण्यासाठी बांधलेली आंतरमार्गिका देखील खुली होणार आहे. तसेच मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी वाहतूकही खुली होणार आहे. त्यामुळे लोअर परळ, वरळी नाका आणि लोटस् जंक्शनकडे जाणारी वाहतूक खुली होईल.

– बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील खुली होणार आहे.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here