जानेवारी २०२६ पर्यंत रूग्णालयातील वैद्यकीय सुविधा विविध टप्प्यात सुरू करण्याच्या सूचना
पी दक्षिण विभागातील गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ नगर महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय पुनर्वसन कामाच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज (दिनांक २३ जानेवारी २०२५) भेट दिली. याठिकाणी नागरिकांना दिलासा देण्यासाठी रूग्णालयातील वैद्यकीय सेवा टप्प्या-टप्प्यात सुरू करण्याचे निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले.
रूग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत काम पूर्ण झाले आहे. रूग्णालयाचे पुढील बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचनाही श्री. गगराणी यांनी संबंधितांना यावेळी दिल्या.
उपआयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले, संचालक (अभियांत्रिकी) श्री. गोविंद गारूळे, सहाय्यक आयुक्त (पी उत्तर) श्री. संजय जाधव, प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) श्री मेहूल पेंटर, सिद्धार्थ रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. महारूद्र कुंभार याप्रसंगी उपस्थित होते.
सिद्धार्थ नगर महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालयाच्या इमारतीत ३०६ रूग्णशय्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण ११ मजली इमारतीमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा असतील. सुमारे ४८ हजार ५८८ चौरस मीटर क्षेत्रात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रूग्णालय इमारतीसह शवविच्छेदन केंद्र, रहिवासी डॉक्टरांसाठी इमारत, कर्मचारी वर्गासाठी इमारत आदींसाठीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या कामाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे विभागांमार्फत मिळवण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रकल्पाचे काम ३६ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजित आहे. रूग्णालयातील सुविधांमध्ये विविध आजारांसाठीचे बाह्यरुग्ण विभाग तसेच शस्त्रक्रिया विभाग, विविध चाचण्यांशी संबंधित निदानासाठी प्रगत स्वरूपाच्या प्रयोगशाळा समाविष्ट असतील. सुपर स्पेशालिटी अंतर्गत विविध आजारांसाठीचे निदान व उपचार सुविधा देखील पुरवण्यात येणार आहे.
***
















