अल्पवयीन मुलीची सुटका केल्याबद्दल पुष्पा डावरे यांचा सत्कार
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी बोलवून दिल्या शुभेच्छा
मुंबई ता. ५ : कबड्डीपट्टू कुमारी पुष्पा चतुरसेन डावरे यांना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी खास बोलावून त्यांचा यथोचित सत्कार केला आणि त्यांच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्याकडून कबड्डी खेळातील समस्या समजून घेतल्या. महाराष्ट्रातील खेळाडूंच्या मदतीसाठी नेहमी उपलब्ध असून आपल्या मातीतील खेळ कबड्डी यांना चांगले दिवस यावेत, त्यासाठी शक्य तितकी मदत करणार असल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
नुकतेच कुर्ला स्टेशनवर मिर्झापूर उत्तर प्रदशवरुन एका अल्पवयीन मुलीला अक्रम जावेद खान हा प्रवाशी घेऊन आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटली. कुर्ला स्टेशनच्या हेडटीसी पुष्पा डावरे (सेंट्रल रेल्वे, मुंबई) यांनी नियोजनबद्धरीत्या त्या मुलीची सोडवणूक करुन तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले आणि तिला पळवून आणणाऱ्या आरोपीला पोलीसांच्या ताब्यात दिले.
ह्युमन ट्राफिकिंगचे प्रकार सातत्याने वाढत असतांना अशा प्रकारची सजक कृती पुष्पा डावरे यांनी केल्याने सर्वत्र पातळीवर त्यांचे अभिनंदन होत आहे. विशेषता पत्रकार शीतल करदेकर यांनी बातमी केल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गो-हे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छांचे पत्र दिले.
महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पुष्पा डावरे यांना बोलवून घेतले आणि त्यांना सत्कार करुन पुढील कारकीर्दिसाठी शुभेच्छा दिल्या. कबड्डी खेळातील समस्या बद्दल माहिती घेतली आणि खेळाडूंच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली.




















