मालाड येथील पालिकेच्या नैसर्गिक वायू दहन भट्टीला प्राणी व पक्षी प्रेमिंचा उत्तम प्रतिसाद !
कांदिवली वार्ताहर / अनिल चासकर
महानगर पालिकेच्या पशु वैद्यकीय आरोग्य खात्याच्या वतीने मालाड एव्हर साईन नगर मध्ये सुरु केलेल्या लहान प्राणी दहन भट्टी मध्ये ५ महिन्यात जवळपास ७०० प्राणी पक्षांची अंत्यविधी करण्यात आली आहे. उपनगरात पालिकेने सुरु केलेल्या नैसर्गिक वायू भट्टीला प्राणी व पक्षी प्रेमिचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई उपनगरात पहिल्यांदाच महानगर पालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने मालाड एव्हर साईन येथे
नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या लहान प्राणी दहन भट्टी चे उद्घाटन करण्यात आले होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) पी. वेलरासू उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे,खासदार गोपाळ शेट्टी आमदार अस्लम शेख,सहाय्यक आयुक्त (पी/उत्तर विभाग) किरण दिघावकर महाव्यवस्थापक, पशुवैद्यकीय आरोग्य खाते व डॉ. कलीमपाशा पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
उपनगरात मोठी लोकवस्ती आहे तसेच भटके कुत्रे, मांजरी आदी पाळीव प्राणी पक्षी यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. अपघात, आजाराने मेलेल्या प्राण्यांना श्वान प्रेमी, प्राणी मित्र वा संस्था स्वयंसेवक खड्डा करून गाडत, तर काही प्राणी अपघातात मरण पावल्याने सफाई कर्मचाऱ्यांकडून कचऱ्यात फेकण्यात येत होते. यामुळे दुर्गंधी, घाण तसेच काही प्रमाणात रोगाचे प्रमाण वाढून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता मात्र प्राणी दहन भट्टीमुळे यावर काही प्रमाणात आळा बसल्याने प्राणी, पक्षी प्रेमिंमध्ये समाधान व्यक्त केले जातं आहे.
याबाबत सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले की,
मृत प्राणी पक्षी यांचे दहन भट्टीमध्ये व्यवस्थित अंत्यविधी होत आहे.सामाजिक संस्था तसेच प्राणी, पक्षी आणि निसर्ग प्रेमिकडून सर्वांधिक वापर होत असल्याचे समाधान असून प्राण्यांसाठी अधिक सुविधा करण्यात येणार आहे.




















