*’शाळांसाठी CCTV महत्त्वाचे’!..अलिबागमधील प्रस्ताव रखडल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या महत्त्वाच्या सूचना!*
मुंबई दि. १३ डिसेंबर २०२४ : अलिबागमधील शाळाचे सीसीटीव्ही बसविण्याचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबतची बातमी एका वृत्तवाहिनीत प्रकाशित झाली आहे. याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रायगड जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे काही निर्देश दिलेले आहेत. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षाविषयी उपाययोजना प्रभावी अंमलबजावणी करीता शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी शासन निर्णय केला होता. तसेच दिनांक १३ मे २०२२ च्या निर्णयाने जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण ) योजना जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच त्यासाठी किमान ५% निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर शासन निर्णयांचे अवलोकन करण्यात यावे. तसेच, विद्यार्थ्यांची सुरक्षा व शाळांचे हित लक्षात घेऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाच्या सूचनाही दिलेल्या आहेत.
शाळेच्या परिसरचा दुरुपयोग टाळण्यासाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे प्राधान्याने बसविण्यात यावेत. खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापन यांना बंधनकारक करावे. तसेच, शासकीय व शासन अनुदानित शाळांना जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे.
अनेकदा सीसीटीव्ही बसवले असले तरीही बंद असतात. त्यामुळे बसविलेल्या CCTV ची ठराविक अंतराने विशेष पथकाद्वारे तपासणी करावी. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आक्षेपार्ह बाबी संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य कार्यवाही करावी. शासनाच्या सूचनांप्रमाणे शाळांमध्ये तक्रार पेटी आवश्यक आहे. त्या तक्रारपेठी ठराविक वेळेला उघडून त्यातील तक्रारीबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
शाळांसाठी सीसीटीव्ही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अनेक वाईट गोष्टींना आळा बसणार आहे. त्यामुळे सीसीटीव्हीसाठीचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा. *”वरील मुद्दयाचे अनुषंगाने प्राधान्याने उचित कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माझ्या कार्यालयास सादर करावा.”* असंही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.















