देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा
शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प
मुंबई शहर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी विशेष मोहीम
मुंबई, दि. १३ : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी या महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.
मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास “स्वीप” चे समन्वय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी तभाने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता सावंत, अपने आप स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक अभिलाषा रावत, नागपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर, प्रसिध्दीमाध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात आदी उपस्थित होते.
विजयकुमार सूर्यवंशी म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आयोजित आजच्या मतदान जनजागृती उपक्रमात एक जागरूक मतदार म्हणून मोठ्या संख्येने सहभागी झालात. तुम्ही जागरूक झालात तुमच्या सोबतच्या सगळ्यांना मतदान करण्यास सांगा. आपल्या एक-एक मताचे योगदान महत्त्वाचे आहे. संविधानाने दिलेल्या तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने समाजातील प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ केली आहे. मतदारयादीत आपले नाव तपासून घ्या. देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले तर मतदानातील सहभागाबाबत श्री. सूर्यवंशी यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.
श्रीमती तभाने यांनी मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे, त्यामुळे काय फरक पडू शकतो, याचे महत्त्व या महिलांना पटवून दिले. मतदान करणे हा आपला हक्क आहे. तुम्ही स्वतः मतदान करा आणि आपल्या परिसरातील महिलांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असून तो आपला अधिकार आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहेत. या निवडणूक प्रक्रियेत एकही जण मतदानापासून वंचित राहू नये, प्रत्येक घटकाने मतदान करावे व मतदानाचा टक्का वाढावा, हा उद्देश आहे.
यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांसोबत प्रश्नावली व बक्षीसाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसीम शेख यांनी तर आभार अपने आप स्वयंसेवी संस्थेच्या पूनम अवस्थी यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
*






















