Home महाराष्ट्र ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

597
0

चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांची घोषणा, यशवंतराव चव्हाण यांच्या ४० व्या पुण्यतिथीदिनी शरद पवार यांच्या हस्ते वितरण

मुंबई

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२४’ ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना जाहीर झाला आहे. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या ४० व्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी इतिहास संशोधक म्हणून त्यांची जडणघडण सुरू झाली. सन १९६९ ते २००१ या काळात डॉ. जयसिंगराव पवारांनी महाविद्यालयीन क्षेत्रात इतिहास अध्यापनाचे कार्य केले. या तीन दशकांहून अधिक काळात इतिहास विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची २० पुस्तके त्यांनी लिहिली आणि ती सर्व महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून अत्यंत सोप्या शैलीत इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी या पुस्तकांमध्ये केली असल्यामुळे ती क्रमिक पुस्तके न राहता, इतिहासप्रेमींची संदर्भ पुस्तके झाली आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांचे अभिनंदन केले आहे.

स्व. चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर २०२४ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ देण्यात येतो.

या पुरस्काराची सुरुवात १९९० पासून झाली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके, ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, प्रा. एन.डी. पाटील, सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया, डॉ. यशवंत मनोहर आदी मान्यवर साहित्यिक आणि संस्थांना या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here