मुंबई
माहिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश बळीराम सावंत यांच्या माहिम येथील मुख्य निवडणूक कार्यालयाचे उदघाटन शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दिवाकर रावते यांच्या हस्ते व सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.
यावेळी खासदार वर्षा गायकवाड, उपनेते मिलिंद वैद्य, महिला आघाडी उपनेत्या विशाखा राऊत,काँग्रेसचे नेते राजन भोसले,
माजी महापौर महादेव देवळे, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सिनेट सदस्य प्रदीप सावंत व मोठया प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य निवडणूक कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मोठया प्रमाणात जमलेल्या शिवसेना व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. गिरणी कामगारांचा मुलगा असलेल्या चाळीत राहणाऱ्या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
*लोकसभेपेक्षा जास्त प्रतिसाद विधान सभेला मिळेल*
*खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केला विश्वास*
माहिम विधान सभेत होणाऱ्या तिरंगी लढतीसाठी आम्ही सज्ज आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी असताना कोरोना काळात सर्वांना एकत्र घेऊन केलेलं काम लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकांनी स्वीकारलं आहे. त्याच्या पेक्षा जास्त प्रतिसाद विधानसभा निवडणुकीला मिळेल, असा विश्वास खासदार व सचिव अनिल देसाई यांनी माहिम विधानसभेच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.
चाळीत राहणारा सर्व सामान्य शिवसैनिक हा उमेदवार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम केलं. यामुळे माहिम विधानसभेत सर्वसामान्य जनतेचा विजय होणार आहे. हा विजय झाल्यावर सर्वसामान्य जनतेला घेऊन बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर अपर्ण करणार आहोत. या मतदारसंघात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. ते सर्व लोक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत आणि राहतील, असा विश्वास माहिम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांनी व्यक्त केला.

















