Home मुंबई यशवंत सेनेचा शिंंदेंंच्या शिवसेनेला जाहीर पाठींबा

यशवंत सेनेचा शिंंदेंंच्या शिवसेनेला जाहीर पाठींबा

154
0
  • यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी केली भूमिका जाहीर

मुंबई

धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या यशवंत सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले आहे. या संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यानंतर ही भूमिका जाहीर केली आहे.

यशवंत सेनेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला आपला पाठींबा जाहीर केला होता. संघटनेच्या वतीने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला होता. मात्र त्यानंतर काही कारणामुळे त्यांनी हा पाठींबा काढून घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काल या संघटनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात धनगर समाजाच्या विविध प्रश्नांबाबत सखोल चर्चा झाली. या चर्चेअंती त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असली तरीही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असल्याचे सांगितले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तज्ञ वकील देखील देण्यात येणार असल्याचे सांगितले.

धनगर समाजाची याचिका फेटाळताना माननीय न्यायालयाने जी पाच जात प्रमाणपत्रे ग्राह्य धरली होती ती रद्द करण्याचा निर्णयही शिंदे यांच्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे धनगर समाजाचा आरक्षण लढ्याला या निर्णयामुळे बळ मिळणार आहे तसेच कोर्टात आरक्षणाच्या बाजूने प्रतिवाद करणे सोपे जणार आहे.

याशिवाय आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजासाठी ‘*महाराष्ट्र मेंढी आणि शेळी सहकार विकास महामंडळ* ‘ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णयही राज्यातील महायुती सरकारने घेतला आहे. या महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, संपुर्ण धनगर समाजासाठी १० हजार कोटी रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महामंडळाचे मुख्यालय पुण्यश्लोक अहिल्यानगर येथे करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. धनगर समाजाला आरक्षण लढ्याला पाठींबा देण्यासह या समाजाचा सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती सरकारने केलेले विविध प्रयत्न पाहता धनगर समाजाची मातृ-संस्था असलेल्या यशवंत सेनेने शिवसेनेच्या आणि महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे माधव गडदे यांनी स्पष्ट केले. तसेच आपली संघटना आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी शिवसेना आणि महायुतीच्याच पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी आपल्या पाठींबा पत्रात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here