अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने दोन वर्षांनी देण्यात येणार्या पुरस्कारांची घोषणा मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.२६) करण्यात आली. २०२४ चे वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार नाटककार व अभिनेता अशोक हांडे, वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना तर बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार सदानंद जोशी यांना जाहीर झाल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम व प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी नाट्य परिषदेत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने वि. वा. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर पुरस्कार १९९८ पासून दिले जात आहेत. यंदा पुरस्काराचे १५ वे वर्ष असून, पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार व वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कारांमध्ये यंदापासून पाच हजारांची वाढ करण्यात आली आहे. ३१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर शहरातील ज्येष्ठ नाट्यकर्मींसाठी सुरू करण्यात आलेले बाबूराव सावंत पुरस्कार २०१४ पासून दिला जात आहे. या पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. यंदा हा पुरस्कार नाट्यकर्मी सदानंद जोशी यांना देण्यात आला आहे. १५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण सोहळा मे २०२४ मध्ये होणार आहे. प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे यांच्यासह डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, ईश्वर जगताप यांचा पुरस्कार निवड समितीत समावेश होता.
यावेळी नाट्य परिषद नाशिक शाखेचे उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, खजिनदार ईश्वर जगताप, सहकार्यवाह विजय शिंगणे, सुनील परमार आदी उपस्थित होते.




















