*धारावी पुनर्विकास प्रकल्प अक्सा आणि मालवणी गावामध्ये राबवण्यास ग्रामस्थांचा विरोध
मालाड, दि.२१ :- धारावी पुनर्वसन प्रकल्प अक्सा व मालवणी गावामध्ये राबवण्यास गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. मढ गावामध्ये पार पडलेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गावकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत भूमिपुत्रांच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत अदानीच्या घशात घालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतला आहे.

बैठकीत गावकऱ्यांना संबोधित करताना आमदार अस्लम शेख म्हणाले, धारवी पुनर्विकासात भूमिपुत्रांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही. गावकऱ्यांच्या पाठिशी आपण ठामपणे उभे असल्याचे शेख यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधण्यासाठी राज्य सरकारच्या मालकीची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. मुंबई उपनगरातील बोरिवली तालुक्यात येणाऱ्या मालाडमधील ‘आक्सा’ आणि ‘मालवणी’ गावच्या परिसरात ही जमीन आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘आक्सा’ आणि ‘मालवणी’ गावांमधील एकूण 140 एकर जमीन प्रचलित बाजार मूल्याच्या 100% वसूल केल्यानंतर डीआरपी/एसआरएला दिली जाईल.
0000



















