Home मनोरंजन दिवाळी निमित्त वांद्रे येथे रंगणार “शब्द दिवाळी”

दिवाळी निमित्त वांद्रे येथे रंगणार “शब्द दिवाळी”

134
0

नॅशनल लायब्ररीतर्फे अभिजात भाषेचा महोत्सवाचे आयोजन

मुंबई, 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करीत वांद्रे पश्चिम येथे नॅशनल लायब्ररीतर्फे दिवाळी निमित्ताने “शब्द दिवाळी”चे आयोजन करण्यात आले आहे. २५ आक्टोबर ते २ नोव्हेंबरच्या दरम्यान हा महोत्सव आयोजन करण्यात आले आहे.

वांद्रे पश्चिम येथील नॅशनल लायब्ररी शंभर वर्षाहून अधिक जूनी संस्था असून सातत्याने विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक उपक्रम राबवित असते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल दिवाळीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, कथाकथन,‍दिवाळी अंकावर चर्चा, काव्यमैफल, मुलाखत असे विविध कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता एकुण सात दिवस या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन एबीपीचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवयत्री यामिनी दळवी करणार आहेत. या कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष आणि लायब्ररीचे उपाध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांनी दिली.
शनिवार २६ ऑक्टोबर रोजी सहा वाजता उद्घाटनानंतर “दिवाळी अंकातील फराळ” या विषयावर चर्चासत्र होणार असून यामध्ये
डॉ. चंद्रकांत भोंजाळ, प्रा. सुजाता राऊत, विनय शिर्के सहभागी होणार असून याचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद कुळे करणार आहेत. तर रविवार २७ ऑक्टोबर रोजी सहा वाजता “झिनझिनाट” करणारी ख्यातनाम कवी डॉ. महेश केळुसकर यांची मुलाखत होणार असून त्यांचा साहित्य प्रवासाबाबत प्रा. वृषाली विनायक संवाद साधणार आहेत.
सोमवार २८ ऑक्टोबर रोजी सहा वाजता “बोजेवार आरपार” या सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार ऊर्फ तंबी दुराई यांचा साहित्य प्रवास उलघडणारी मुलाखत वृंदा दाभोलकर घेणार आहेत. तसेच मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी कथा कथनाचे आयोजन करण्यात आले असून कथाकार मोनिका गजेन्द्रगडकर, गणेश मतकरी, विठ्ठल सावंत हे यामध्ये सहभागी होणार आहेत तर शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी ६ वाजता अभिवाचन (जयवंत दळवी आणि मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्ष) जयवंत दळवींची कथा वस्त्रहरण अभिवाचकः यशश्री दाभोलकर मधुसूदन कालेलकर यांचे नाटक, सागरा प्राण तळमळलाअभिवाचक : प्रा. मंदार टिल्लू आणि गंधारचा चमू करणार आहेत तर शनिवार २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी “काव्यसंध्ये”चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सुनंदा भोसेकर, भारती बिर्जे डिग्गीकर, सतीश सोळांकूरकर, गोविंद नाईक आदी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून साहित्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यवाह प्रमोद महाडिक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here