Home Uncategorized विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024

131
0

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहिर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार आहें. सदर निवडणूकांचे वेळापत्रक पुढिलप्रमाणे आहे:-

राजपत्रात अधिसूचना निर्गमित करण्याचा दिनांक
दिनांक 22.10.2024 (मंगळवार)
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक
दिनांक 29.10.2024 (मंगळवार)
नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक
दिनांक 30.10.2024 (बुधवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक
दिनांक 04.11.2024 (सोमवार)
मतदानाचा दिवस
दिनांक 20.11.2024 (बुधवार)
मतमोजणीचा दिनांक
दिनांक 23.11.2024 (शनिवार)
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक
दिनांक 25.11.2024 (सोमवार)

२. आदर्श आचारसंहिता
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात आजपासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. सदर आचार संहिता विधानसभा नविन सभागृह गठीत होण्याबाबतची संविधानिक अधिसूचना जारी होईपर्यंत लागू राहिल. त्यामुळे उपरोक्त कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने
नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.४० लाख इतकी आहे.
राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्त होणा-या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येते.
सर्व राजकीय पक्ष, प्रसिध्दी माध्यम आणि शासकीय विभाग प्रमुख यांचेबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत राज्य व जिल्हास्तरावर माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्र सुध्दा निर्गमित करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठीच्या शिफारशी माहिती व जनसंपर्क संचालनालया मार्फत विहित मुदतीत व प्रपत्रात करावयाच्या आहेत.
तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts) याची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मॅन्युअल / हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.in वर निवडणुकी संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
3. मतदारांची संख्या :-
सन २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्यावयत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-
अ.क्र.

तपशील

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार

दि.30 ऑगस्ट, 2024
रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील
मतदार
दि.१5.10.२०२४ रोजी अद्यावत मतदारांची संख्या

1
पुरुष
4,67,37,841
4,93,33,996
4,97,40,302
2
महिला
4,27,05,777
4,60,34,362
4,66,23,077
3
तृतीयपंथी
2,593
5,944
6,031

एकूण
8,94,46,211
9,53,74,302
9,63,69,410

निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19.10.2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील.

3.2 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) – २०२४ :- 25 जुन, 2024 ते 30 ऑगस्ट, 2024 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (दुसरा) राबविण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती जनतेला होण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृह निर्माण संस्थांच्या पदाधिकारांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत.
3.3 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) – २०२४ अंतर्गत स्वीप उपक्रम :- या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.
3.4 दिव्यांग मतदार (PwDs) :- भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे अॅप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातून तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (दुसरा) च्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबीरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस 6,36,278 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेव्दारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

3.5 वरील सर्व प्रक्रिया करताना वेळोवेळी राज्य व जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच, पत्रकार परिषदा घेऊन इत्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच, राजकीय पक्षांच्या बैठकांचे इतिवृत्त जतन करण्यात आलेले आहेत.
3.6 दि.30.08.2024 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3.7 या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. मतदार यादी संदर्भातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत :-
(3.7.1) सन २०१९ सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्याप पर्यत 69,23,199 इतकी वाढ झाली आहे.

(3.7.2) सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन २०१९ साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे ९25 इतके होते. याकरिता महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे २०२४ मध्ये या प्रमाणात ९36 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

(3.7.3) सध्याच्या मतदार यादीत १८-1९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 20,93,206 एवढी आहे.

(3.7.4) याशिवाय 1,16,355 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

(3.7.5) अद्यावत मतदार यादीमध्ये ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12,43,192 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील 85 वर्षावरील जेष्ठ नागरिकांपैकी 47,716 इतके मतदार १०० वर्षावरील आहेत.

4. मतदानाची टक्केवारी :-

सन २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
विधानसभा / लोकसभा निवडणूक
पुरूष मतदान (%)
महिला मतदान (%)
तृतीयपंथी मतदान (%)
एकूण (%)
विधानसभा सन 2014
64.33
61.69
37
63.08
विधानसभा सन 2019
62.77
59.26
25.48
61.1
लोकसभा सन 2024
63.45
59.04
25.35
61.33

5. मतदान केंद्र:-
सन २०१९ च्या तुलनेमध्ये मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये पुढील प्रमाणे वाढ झाली आहे.
तपशिल
विधानसभा-2019
विधानसभा-2024
एकूण मतदान केंद्रे
96653
1,00,186

 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी १५०० इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे.
आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठीयोग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इत्यादी किमान सुविधा (Assured Minimum Facilities), प्रसाधन सुविधा, इ.पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत, फक्त मुंबई प्रादेशिक विभागामध्ये उद्वाहन असेल तर वरच्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आलेले आहे.
तसेच शहरी भागातील मतदारांची अनस्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत.

6. निवडणुकीसाठी कर्मचारीवृंद :-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे ६ लाख इतका कर्मचारीवृंद नेमण्यात येणार आहे. तसेच पुरेसा पोलिस कर्मचारीवृंद तैनात करण्यात येणार आहेत.

7. प्रशिक्षणः-

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक, क्षेत्रिय अधिकारी, पोलिस क्षेत्रिय अधिकारी, पोलिस अधिकारी/कर्मचारी, भरारी पथके, स्थायी पथके, व्हिडीओग्राफर/फोटोग्राफर, इ. चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतदानाकरिता नेमण्यात येणा-या मतदान अधिकारी/कर्मचा- यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

8. EVM-VVPAT :-

महाराष्ट्रामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूकीमध्ये EVM-VVPAT चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2,26,624 BUs, एकूण १,26,911 CUs आणि एकूण १,37,118 VVPATS यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (First Level Checking) पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम दि. 10.09.2024 ते दि.09.10.2024 या कालावधीत राबविण्यात आला. सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे याची जनतेला माहिती देण्यात आली. या जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी ठरला असून जनतेने या कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात सक्रिय सहभाग घेतला आहे.
9. महत्वाची संगणक प्रणाली (IT Application):-

यंदाच्या निवडणूकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने काही संगणक प्रणाली विकसित केलेली आहे. ते थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.

(1) cVigil:- आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारीचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने Vigilहे मोबाईल अॅप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर अँपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

(2) सक्षम App :-

पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे IT Application उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
(3) KYC (Know Your Candidate) App :-

मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेले गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती, इ. माहिती पाहता येऊ शकते.

(4) ESMS App/Portal.

निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातु, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहे. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी ESMS App/ Portal वरुन कळविण्यात येत आहे.

10. १९५० क्रमांकाची हेल्पलाईन :-

1.राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre) स्थापन करण्यात आले आहेत.
2.मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात येईल.

११. मतदानाची सज्जता :-
प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावर पुरवावयाच्या सोयी सुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तरी निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here