ठाणे,
अखिल भारतीय बालनाट्य परिषदेतर्फे ठाण्यात येत्या रविवारी १३ ऑक्टोबर रोजी आयोजित दिव्यांग महोत्सवात २० विशेष शाळांतील सुमारे ३०० मुले आपली कला सादर करणार आहेत. अशा प्रकारचा भव्य महोत्सव प्रथमच ठाण्यात होत आहे.
तीन हात नाक्याजवळ इटर्निटी गृहसंकुलाजवळ बाळासाहेब ठाकरे स्मारक मंदिरात रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून *यहाँ के हम सिकंदर* नावाचा हा महोत्सव होणार आहे.
अखिल भारतीय बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष,नीलमताई शिर्के-सामंत यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. खासदार श्री.नरेश म्हस्के, चित्रकार श्री.विजयराज बोधनकर, शिक्षण तज्ज्ञ श्रीम.मीरा कोरडे आदी मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास खासदार श्री.म्हस्के यांनी विशेष सहकार्य केले आहे.
ठाणे शाखेतर्फे श्री.मिलिंद बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या उपक्रमात विविध २६ संस्था सहभागी होत आहेत. यामध्ये नृत्य,नाट्य,संगीत, चित्रकला , मातीकाम आदी कला सादर होणार आहेत. सहभागी संस्थांमधील शिक्षक तसेच पालक यांच्यात उत्साह दिसून येत आहे.या निमित्ताने मुलांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.
ठाणे शाखेचे कार्यकर्ते हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत असे श्री बल्लाळ यांनी सांगितले. रंगभूमी सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक करण्याचा बालरंगभूमी परिषदेचा हेतू आहे असे श्रीमती शिर्के सामंत म्हणाल्या. या दिव्यांग महोत्सवापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यातील मुलांनी बालरंगभूमी परिषद आयोजित लोककलामहोत्सव उत्साहात साजरा केला, असेही त्या म्हणाल्या.



















