Home मुंबई *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मुंबईच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना मिळणार*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मुंबईच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना मिळणार*

8
0

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मुंबईच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना मिळणार*

• *वैभव संगोपन योजनेंतर्गत शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे संगोपनासाठी; वरळी किल्ल्याच्या संवर्धनासाठीही प्रयत्न*

• *बाणगंगा, वरळी कोळीवाडा आणि शिवडी किल्ल्यात वारसा जतनासोबत महिला सक्षमीकरणावर भर*

मुंबई, दि. २९ : मुंबईचा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरांचा वारसा जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने वारसा संवर्धनाच्या उपक्रमांना चालना मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार आरपीजी फाउंडेशनने शिवडी किल्ला संगोपनासाठी दत्तक घेतला आहे. याच योजनेच्या माध्यमातून वरळी किल्ल्याच्या संवर्धनालाही चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, स्थानिक संस्कृतीचे दस्तऐवजीकरण, नागरी सुविधांमध्ये सुधारणा आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगारनिर्मिती, अशा विविध अंगांनी मुंबईच्या वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आरपीजी फाउंडेशनचा उपक्रम असलेल्या ‘द हेरिटेज प्रोजेक्ट’च्या माध्यमातून बाणगंगा, वरळी कोळीवाडा आणि शिवडी किल्ला या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी संशोधन, जनसहभाग, सांस्कृतिक उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले असून, २७० हून अधिक महिलांना उपजीविका आणि उद्योजकतेसाठी सहकार्य करण्यात आले आहे.

*वैभव संगोपन योजनेंतर्गत शिवडी किल्ल्याचे संगोपन*

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील ऐतिहासिक शिवडी किल्ला हा शहराच्या सागरी इतिहासाचा महत्वपूर्ण भाग आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप जतन करून त्याला नव्याने ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत आरपीजी फाउंडेशनने किल्ला संगोपनासाठी दत्तक घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या मान्यतेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
किल्ल्याचा इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि मुंबईच्या सागरी वारशाशी असलेले नाते नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संग्रहालय आणि माहिती केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून ऐतिहासिक स्थळाचे महत्व अधोरेखित होण्यासोबतच नागरिक आणि पर्यटकांना मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेता येणार आहे.

*वरळी किल्ल्याच्या संवर्धनालाही प्राधान्य*

वैभव संगोपन योजनेच्या माध्यमातून वरळी किल्ल्याच्या संवर्धनासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. वरळी कोळीवाड्यातील वारसा संवर्धनाच्या कामाचा किल्ल्यापर्यंत विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. कोळी समाजाचा इतिहास, परंपरा, जीवनशैली आणि सांस्कृतिक ओळख जतन करून हा वारसा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जात आहे.

वरळी कोळीवाड्यात ७१ हून अधिक पथदिवे, ३० हून अधिक माहितीफलक आणि सातहून अधिक सार्वजनिक भित्तिचित्रे उभारण्यात आली आहेत. यामुळे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यासोबतच कोळी समाजाच्या सांस्कृतिक वारशाला सार्वजनिक व्यासपीठ मिळत आहे.

*कोळी महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन*

वरळी कोळीवाड्यातील १२० हून अधिक महिलांना कौशल्यविकास आणि उद्योजकतेसाठी सहकार्य करण्यात आले आहे. ‘शेफ्स ऑफ कोळीवाडा’ या उपक्रमातून महिलांनी पारंपरिक कोळी खाद्यसंस्कृतीला नवी ओळख मिळवून दिली आहे. विविध खाद्य महोत्सव आणि प्रदर्शनांमधील सहभागामुळे त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळत असून, स्थानिक परंपरांच्या जतनासोबत रोजगारनिर्मितीलाही हातभार लागत आहे.

*बाणगंगा परिसराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन*

मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात वारसा संवर्धनासोबतच या स्थळाचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत १५० हून अधिक महिलांना उद्योजकता, शिवणकाम आणि आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. विविध कार्यक्रम आणि अनुभवात्मक उपक्रमांच्या माध्यमातून ५०० हून अधिक पर्यटकांनाही या वारसास्थळाशी जोडण्यात आले आहे.

*वारसा संवर्धनातून सर्वसमावेशक विकास*

मुंबईचा वारसा हा केवळ ऐतिहासिक वास्तूंपुरता मर्यादित नसून, स्थानिक समुदायांच्या परंपरा, कला, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीतही तो जिवंत आहे. त्यामुळे वारसा संवर्धनासोबतच परिसरातील नागरी सुविधा सुधारणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि पर्यटनाला चालना देणे यांना महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैभव संगोपन योजनेच्या माध्यमातून शिवडी आणि वरळी किल्ल्यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे संगोपन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे सफल होताना दिसत आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here